शवविच्छेदनासह अन्य रखडलेल्या कामांना चालना

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ग्रामीण रूग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटरमधील शवविच्छेदनासह अन्य रखडलेली कामे मार्गी लागणार असून आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते याचे भूमिपुन करण्यात आले.

शहराला लागूनच ग्रामीण रूग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात आले असून कोविड काळात या हॉस्पीटलने अतिशय मोलाची भूमिका बजावली होती. मात्र येथील काही कामे अजून देखील प्रलंबीत होती. यात प्रामुख्याने . शवविच्छेदन कक्ष, रस्ते, संरक्षण भिंत, कॉरीडॉरसह अन्य कामांचा समावेश होता. विशेष करून पोस्टमार्टमची सुविधा नसल्याने मोठी गैरसोय होत होती. या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटरच्या उर्वरित कामासाठी जिल्हा नियोजन समितीने ४ कोटी २१ लाख १९८ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने मंगळवारी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या कामांच्या अंतर्गत स्वतंत्र पोस्टमार्टम कक्ष उभारण्यात येत आहे. यासोबत रूग्णालयास ९०० मीटर संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, दोन्ही इमारतींना जोडणार्‍या कॉरिडॉरचे बांधकाम करणे, अंतर्गत रस्ते व डांबरीकरणाचे काम पूर्ण करणे, पार्किंग शेड बांधकाम, पंपहाऊस व बोअरवेल, मेडिकल वेस्ट डिस्पोजल टँक बांधकाम, पेव्हर ब्लॉक व फ्लॅग पोस्ट बनवणे आदी कामांना सुरुवात झाली आहे.

याप्रसंगी आमदार संजय सावकारे यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मयूर चौधरी, साकेगावचे प्रभारी सरपंच आनंद ठाकरे, भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, प्रकाश बतरा आदी उपस्थित होते.

Protected Content