धामणगाव येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेस प्रारंभ

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील धामणगाव येथे कै. बा. सु. सपकाळे विद्यालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सपकाळ यांचे उपस्थित लाभार्थीस जंतनाशक गोळी देऊन जंतनाशक मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.

यावेळी डॉ. अजय सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना जंतनाशक कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी पं. स. चे आरोग्य विस्तार अधिकारी संजय महाजन, आरोग्य सहाय्यक राजेंद्र बारी, मनोज महाजन, एन एस पाटील, मुख्याध्यापक हेमेंद्र सपकाळे व कविता सपकाळे आदी उपस्थित होते.

राज्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला – मुलींना जंतनाशक गोळी देऊन पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे व राज्यातील कृमी दोषाचे रुग्ण शून्यावर आणणे हा या राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. यासाठी व्यापक नियोजन करून आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात व तालुक्यात दिनांक १० ऑक्टोंबर २०२२ ते १७ ऑक्टोंबर २०२२ दरम्यान १ वर्ष ते १९ वर्ष वयोगटात राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. तुषार देशमुख व ता. आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांचे मार्गदर्शक सूचनांनुसार राबवला जात आहे.

प्रा. आ. केंद्र धामणगाव कार्यक्षेत्रात विदगाव, उपकेंद्र ममुराबाद, मोहाडी व सावखेडा बु. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रमसिग घोगले व डॉ. अजय सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक राजेंद्र बारी, धनराज सपकाळे, आरोग्य सहाय्यिका प्रतिभा चौधरी हे मोहीम राबवित आहेत.

आज जंतनाशक दिनी १ ते १९ वर्ष वयोगटातील मुला- मुलींना अंगणवाडी, प्रा. शाळा, विद्यालय व महाविद्यालयात जंतनाशक गोळ्या समक्ष खाऊ घालण्यात आल्या. ज्या लाभार्थ्यांना किंवा बालकांना आजारी असल्यामुळे किंवा काही कारणामुळे आज जंतनाशक गोळी मिळाली नाही त्यांना मापअप राऊंड दि. १७ ऑक्टोंबर २०२२ रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. पालकांनी जंतनाशक मोहिमेस सहकार्य करावे असे आव्हान डॉ. विक्रमसिंग धोगले यांनी केले आहे.

जंतनाशक कार्यक्रमास (मोहिमेस) आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक व नोडल शिक्षक आदींचे सहकार्य लाभत आहे.

 

Protected Content