कोरोनाच्या प्रतिकारासाठी प्रशासनाला सहकार्य करा : डॉ. नि. तु. पाटील

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाची रूग्णसंख्या पुन्हा वाढीस लागली असतांना उपचारासाठी आरोग्य प्रशासनाची तारांबळ उडत आहे. या सर्वांबाबत थेट ग्रामीण रूग्णालयाची पाहणी केल्यानंतर येथे उपचारासाठी यंत्रणा असली तरी सामग्रीची थोडी कमतरता असून याबाबत जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन भाजप वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी केले आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळसह परिसरात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणांवर ताण आला आहे. शहरानजीक असणारे ग्रामीण रूग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोरोनावर उपचार होत असून तेथे सुविधांचा अभाव असल्याची ओरड होत आहे. या अनुषंगाने भाजप वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी या हॉस्पीटलला तीन तास भेट देऊन इत्यंभूत माहिती जमा केल्यानंतर येथे उपचारासाठीच्या आवश्यक सुविधा असल्या तरी काही थोड्या बाबींची कमतरता असल्याचे त्यांना जाणवले. या अनुषंगाने त्यांनी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

डॉ. नि. तु. पाटील यांनी खालील प्रमाणे आवाहन केले आहे.

मी स्वत: दि.१८ मार्च गुरुवार रोजी भुसावळ ग्रामीण रुग्णालय आणि ट्रुमा केअर सेन्टर ला दुपारी ३ ते संध्याकाळी ६ पर्यंत भेट देत सर्व माहिती,अडीअडचणी, गरजा यांची सर्व माहिती तेथील डॉ. स्टाफ, कर्मचारी शिवाय रुग्ण, नातेवाईक यांकडून देखील घेतली…!
सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांना होणार्‍या औषध उपचाराबद्दल समाधान असून डॉ. स्टाफ याबद्दल चांगले मते आहेत. मात्र काही बाबींची मला कमतरता जाणवली .

* करोना ग्रस्त रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी नाही, तशी सोय नाही.

* उन्हाळ्याचे दिवस असून रुग्णांना रेक्सिन बेड वर झोपावे लागते, बेड शीट नाहीत.

* कचरा जमा करण्यासाठी डस्टबिन नाहीत; खिडक्यांना पडदे नाहीत; औषधे ठेवण्यासाठी कपाटे नाहीत.

* हॉस्पीटलमध्ये टेबल, खुर्च्या नाहीत; कॉम्प्युटर, प्रिंटर आदी सामग्री नाही.

* ऑक्सिजन सिलेंडर वाहतुकीसाठी ऑक्सिजन स्टँड नाही.

* पुरेशा स्टाफ,डॉ, कर्मचारी, सुरक्षा रक्षक नाहीत; व्हेंटिलेटर असून डॉक्टर नाहीत.

* एक्स-रे मशीन असून बचावात्मक साहित्य नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिले,पण अजूनही उपलब्ध नाही.

* जेष्ठ नागरीक लसीकरण साठी बसण्यासाठी खुर्ची नाहीत. यामुळे त्यांना उन्हात उभे राहावे लागते.

* परिसरात स्वच्छता समाधानकारक नाही.

* येथे ४० खाटांची सुविधा असुन अजूनही ४० बेड वाढवता येतील पण स्टाफ नाही. गैरसोय आणि गैरसमज वाढण्यास त्यामुळे मदत होईल.

* येथे आवश्यक असणारे कपाट, लॉकर, रेफ्रिजरेटर आदी बाबी आढळून आल्या नाहीत.

सध्याच्या महामारीमुळे जळगाव जिल्हा प्रशासनावर कमालीचा ताण आहे,दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे,रुग्ण सेवा देणारे डॉ. मंडळी,स्टाफ ,कर्मचारी यांची उणीव भासत आहे.

तेव्हा जसे आपल्याला आपले अधिकार लक्षात राहतात,पण कर्तव्य सोयीने विसरले जातात. तसे न होता भुसावळ अथवा परिसरातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात शक्य होईल तेवढी मदत करा असे माझे आवाहन आहे.

लोकप्रतिनिधीना,जिल्हा प्रशासन कडे मी स्वतः हा भेटून सर्व चित्र त्यांच्यासमोर मांडून लवकरात लवकर मदतीचे आवाहन करणार आहे…!

सर्वांना नम्र विनंती आहे की,रुग्णालयात भौतिक सुविधांचा विचार करता ,रूग्णांना उत्तम सेवा देण्यासाठी शक्य असेल त्यांनी शक्य होईल तेवढी सढळ हाताने मदत करा, प्रशासनाचा ताण कमी करा…! असे डॉ. नि. तु. पाटील यांनी आवाहन केले आहे.

या संदर्भात डॉ. पाटील हे स्वत: पुढाकार घेत असून आपण त्यांच्याशी ८०५५५९५९९९ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

Protected Content