तहसीलदारांच्या वाहनाची धडक; उपोषणार्थी महिला गंभीर जखमी!

पारोळा, प्रतिनिधी | शहरातील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणावेळी अचानक तहसीलदार यांच्या वाहनाची धडक एका उपोषणाला बसलेल्या महिलेला बसल्याने त्यात महिला हि गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली.

याबाबत वृत्त असे की, शहरातील डी. डी. नगर येथील नितीन वना पाटील हे विविध मागण्यासाठी आपल्या परिवारासह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. प्रशासन आणि त्यांच्यात बैठका झाल्या आहेत. परंतु प्रशासन वतीने त्यांना ठोस आश्वासन व मागितलेली माहिती मिळत नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. असे आरोप नितीन पाटील यांनी केले आहे. दरम्यान काल सायंकाळी तहसीलदार अनिल गवांदे हे कार्यलयातुन घरी जात असतांना उपोषणाला बसलेली महिला रंजनी पाटील यांनी त्यांच्या वाहनाला हात दाखवून थांबण्याची विनंती केली. परंतु वाहन जागेवर न थांबल्याने रंजनी पाटील यांना वाहनाची धडक लागली. व त्या जमिनीवर कोसळल्या. झालेल्या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याच ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडून होत्या. त्यानंतर त्यांना कुटीर रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. त्यांचा डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान रंजना पाटील जखमी होऊन देखील तहसीलदार यांनी आपल्या वाहनातून खाली न उतरता व विचारपूस न करताच असेच निघून गेल्याचे आरोप नितीन पाटील यांनी केला आहे. या घटनेबाबत मात्र पोलीस ठाण्यात कुठलेही तक्रार उशिरापर्यंत दाखल करण्यात आलेली नव्हती.

 

Protected Content