शिक्षकांचा गौरव हवाच, मात्र त्यांची फरफट कधी थांबणार ? : डॉ. पाटील

भुसावळ प्रतिनिधी | काल शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. सर्वत्र गुरूजनांचे कौतुक करण्यात आले, त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त झाली. मात्र शिक्षण विभाग हा शिक्षकांची कशा प्रकारे फटफट करतो याची भेदक माहिती भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी जगासमोर मांडली आहे.

याबाबत वृत्त असे की, डॉ. नि. तु. पाटील यांनी शिक्षक दिनाला एका पोस्टच्या माध्यमातून एका प्रकरणाला वाचा फोडली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, जिल्हा परिषद जळगाव, शिक्षण विभागाने जिल्हातील १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला,त्याबद्दल सर्व गुरुजनांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा….! पण,मित्रांनो जो पर्यंत शिक्षक पदावर कार्यरत आहे तोपर्यंत हा आदरभाव शिक्षण विभाग दाखवतो.पण एकदा का तुम्ही सेवानिवृत्त झाले हि पहा मग हाच विभाग तुमची कशी फिराफिर करतो,हे लक्षात येण्यासाठी खालील उदाहरण पहा. जळगाव जिल्हा मधील यावल तालुक्यातील एक शिक्षिका ३१ मे २०१६ ला सेवानिवृत्ती होते.सेवानिवृत्ती नंतर सर्व शासकीय सोपस्कार पार पडले जातात, सेवानिवृत्ती वेतनसाठी सर्व कागदपत्रे दिली गेल्यावर नियमित सेवानिवृत्ती वेतन सुरु होते. दि.३०/०१/२०१९ ला महाराष्ट्र शासन वित्तविभाग अधिसूचना जाहीर करत सातव्या वेतन आयोगानुसार वेतन आणि सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे असे जाहीर करते आणि मग १ जुन २०१६ पासून सुधारित सेवानिवृत्ती वेतन फरकाची रक्कम मिळण्यासाठी खरी लढाई सुरु होते, ती आजतागायत, हो आजतागायत, सलग ६ वर्षे …..! सुरूच आहे.

दि. २ जुलै २०२० ला प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी सातवा वेतन आयोग वेतन त्रुटी पूर्तता साठी पत्र पंचायत समिती यावल यांना दिले.( खरी गम्मत याठिकाणीच आहे.)

दि. ८ मार्च २०२१ ला याबाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य लेखा अधिकारी यांना सदर सेवानिवृत्त शिक्षिका मार्फत पत्र दिले जाते. (काहीही कारवाई नाही.)

दि. १७ मे २०२१ ला परत सदर सेवानिवृत्त शिक्षिका लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त मुंबई यांना याबाबत पत्र लिहून न्याय मिळण्यासाठी मागणी करते.

दि. २१ जुन २०२१ ला सेवानिवृत्त शिक्षिका मला (डॉ.नि. तु. पाटील ) याबाबत लक्ष घालावे म्हणून लेखी पत्र देते.

दि. २८ जुन २०२१ ला डॉ.नि. तु. पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी,जळगाव यांना सर्व पत्र देत सुधारित सेवानिवृत्ती वेतन फरकाची रक्कम मिळण्यासाठी विनंती करतात. आ.संजय सावकारे आणि जिल्हाधिकारी आदींना प्रत रवाना केली जाते.आता यंत्रणा थोडीफार हलायला सुरवात होते.दि. २९ जुन २०२१ ला म्हणजे दुसर्‍याच दिवशी शिक्षण विभागाद्वारे सदर सेवानिवृत्त शिक्षिकेला फोनवर वर माहिती देत आपले प्रकरण अजूनही यावल पंचायत समितीने पाठवले नाही,असे सांगण्यात येते. सदर सेवानिवृत्त शिक्षिकेची सेवा पुस्तिका गहाळ …..!

मला सर्व वृत कथन केले जाते,मी सदर सेवानिवृत्त शिक्षिकेच्या मुलाला सांगतो,तुम्ही स्वतःहा यावलला जा,माहिती घ्या,माझ्या पत्राची आठवण द्या, आधी फोन वर बोला मग तारीख घेत भेटायला जा आणि मग मला सांगा ….!

दि. ११ जुलै २०२१ ला मुलगा यावल ला जातो.

तेथील अधिकारी म्हणतात,आम्ही कधीच प्रस्ताव पाठवला आहे….!

जळगाव जिल्हा परिषद म्हणते,आले नाही..!

सदर सेवानिवृत्त शिक्षिकेची सेवा पुस्तिका गहाळ …..!

शोधाशोध सुरु होते,वातावरण गरम होत जाते.शेवटी सेवा पुस्तिका यावललाच सापडते.मुलगा म्हणतो आजच सर्व बाबी पूर्ण करा,मी दिवसभर थांबतो आणि मीच हातोहात जळगावला घेवून जातो.प्रस्ताव लगेच तयार होतो.दि. १३ जुलै २०२१ ला प्रस्ताव वरिष्ठ लेखाधिकारी,अर्थ विभाग यांच्याकडे हातोहात दिला जातो.

दि. २ ऑगस्ट २०२१ ला लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त मुंबई यांचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी,जळगाव यांना येते.( दि. १७ मे २०२१ च्या पत्राला उत्तर)

दि. २५ ऑगस्ट २०२१ पंचायत समिती यावल, हे लोक आयुक्त तक्रार संदर्भाने पत्र लेखाधिकारी -२ जळगाव यांना देते.

मित्रहो,शासकीय काम अन सहा महिने थांब,हि प्रचलित म्हण आपणास माहिती आहे,पण आता शासकीय काम अन सहा वर्षे थांब ही सुधारित म्हण, शिक्षण विभाग रुजवत आहे.सदर सेवानिवृत्त शिक्षिका मागील ६ वर्षापासून आपल्या सेवानिवृत्ती वेतनाची रक्कम मिळावी म्हणून पत्र व्यवहार करत आहे. हेलपाटे मारत आहे. पण कोणाचीही संवेदना जागृत झाली नाही.शासकीय कर्मचारी वर्गाने किमान एकदाचे जाहीर तरी करावे,आम्हाला राजकीय दबावाखाली काम करण्याची सवय किंबहुना इच्छा असते,तेव्ह्या काहीही नियमानुसार काम असले तरी त्यासाठी राजकीय दडपण अत्यावश्यक आहे,तसे प्रयोजन आधीच करून ठेवावे,म्हणजे काम जलद होतील…!आता,किमान या लेखाद्वारे एक अपेक्षा आहे, सदर प्रकरण हे आता मुख्य लेखा अधिकारी,वित्त विभागात आहे त्यांनी लवकरात लवकर सर्व सोपस्कार पूर्ण करून ते यावल पंचायत समितीला पाठवावे,जेणे करून ६ वर्षापासून रखडलेल्या सुधारित सेवानिवृत्ती वेतन फरकाची हक्काची रक्कम मिळेल.

नाहीतर, जो पर्यंत शिक्षक पदावर कार्यरत आहे तोपर्यंत आदरभाव,

सेवानिवृत्त झाले की करत बसा पत्रव्यवहार …!

डॉ.नि. तु. पाटील, भुसावळ
उत्तर महाराष्ट्र,सहसंयोजक
वैद्यकीय आघाडी,भाजप,महाराष्ट्र

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!