भुसावळच्या भाजप नगरसेविकेला दिलासा; अपात्रता निर्णयास स्थगिती

भुसावळ प्रतिनिधी । जात प्रमाणपत्र प्रकरणी भाजपच्या नगरसेविका अनिता एकनाथ सोनवणे यांच्या अपात्रतेला नगरविकास विभागाने स्थगिती दिली आहे. यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

याबाबत माहिती अशी की, नगरपालिकेच्या २०१६ मधील सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात अ मधील अनूसूचित जमाती महिला राखीव जागेवरुन निवडून आलेल्या अनिता एकनाथ सोनवणे यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. या कारणाने माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी अलीकडेच त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते.

दरम्यान, या प्रकरणी सोनवणे यांनी नगरपालिका अधिनियम १९६५ चे कलम ९ – अ च्या तरतुदीनुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे अपील दाखल केले होते. या अपीलावर नगरविकास विभागाने १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयावर पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. यामुळे नगरसेविका सोनवणेंसह भाजपच्या गटाला दिलासा मिळाला आहे. तर तक्रारदार केदारनाथ सानप यांनी या प्रकरणी आपण न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती दिली आहे.

Protected Content