जळगाव प्रतिनिधी | पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पिंप्राळ्यात विकासकामांचे भूमीपुजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा नियोजनकडून मिळालेला विक्रमी निधी, अलीकडे प्रदान झालेला निधीच्या माध्यमातून शहरातील रस्त्यासह विविध विकासकामे मार्गी लागणार असून शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले.
जळगाव शहरात मध्यंतरीच्या काळामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर जिल्हा नियोजन निधीतून मिळालेला विक्रमी निधी आणि अलीकडच्या काळात प्रदान करण्यात आलेल्या ४२ कोटींच्या निधीमुळे शहरातील प्रमुख कामे मार्गी लागणार आहेत. विशेष करून यातून रस्ते तयार होणार असून उर्वरित ५८ कोटींसाठी पाठपुरावा सुरू आहे. या माध्यमातून जळगाव शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
पिंप्राळा उपनगरातील विविध विकासकामांचे भूमिपुजन केल्यानंतर बोलत होते. याप्रसंगी त्यांनी जळगाव शहरातील विकासकामांना गती आली असून आधी नितीन बरडे तर आता कुलभूषण पाटील यांच्या कामांच्या भूमिपुजनातून ही बाब अधोरेखीत झाल्याचे नमूद केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीआधी शहरातील रस्त्यांच्या कामांना प्रारंभ झालेला असेल अशी महत्वाची घोषणा देखील पालकमंत्र्यांनी याप्रसंगी केली.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या विकासासाठी भरीव निधी मिळालेला आहे. अलीकडेच शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी ४२ कोटींचा निधी प्राप्त झाला असून पुढील आठवड्यात या कामांना प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमिवर, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या पिंप्राळा परिसरातील प्रभाक क्रमांक १० मध्ये नगरोत्थान तसेच दलीत वस्ती सुधार योजनांच्या माध्यमातून विकासकामांचे भूमिपुजन करण्यात आले. यात कॉंक्रिटीकरण, गटारी, रस्ता डांबरीकरण, कल्व्हर्ट आदी कामांचा समावेश होता. या सर्व कामांचे एकत्रीत मूल्य ३ कोटी १० लक्ष रूपये इतके होते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते कार्यक्रमांचे भूमीपुजन करण्यात आले. तर याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्रीताई महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, महिला आघाडीच्या महानगरप्रमुख सौ.शोभा चौधरी, उपमहानगरप्रमुख सौ.ज्योती शिवदे, नगरसेवक प्रशांत नाईक, ललित कोल्हे, अमर जैन, सौ.शोभा बारी, सुरेश सोनवणे, गणेश सोनवणे, किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे, उमेश सोनवणे, बंटी जोशी, शेख हसीनाबी शरीफ, सौ. सरिता माळी-कोल्हे, सौ.मंगला बारी यांच्यासह युवा सेना पदाधिकारी, शिवसैनिक, महापालिका अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे पिंप्राळा येथे आगमन होताच त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने पालकमंत्र्यांचे स्वागत केले. यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत कामांचे भूमीपुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केले. ते म्हणाले की, पिंप्राळा परिसर हा विकासकामांपासून कोसो दूर होता. मात्र मार्च महिन्यात महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर या भागासाठी तब्बल दहा कोटी रूपयांच्या विकासकामांना निधी प्रदान करण्यात आला असून याच्या माध्यमातून या भागाच्या प्रगतीला गती येणार आहे. पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने पिंप्राळा परिसराचा अक्षरश: कायापालट होणार असल्याचे उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले.
महापौर जयश्रीताई महाजन यांनी आपल्या मनोगतातून आजवरच्या कामाचा लेखाजोखा प्रस्तुत केला. त्या म्हणाल्या की, मार्च महिन्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर शहरात विकासाचे नवीन पर्व सुरू झाले आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी खर्या अर्थाने पालकत्वाची भूमिका घेतली असून आज पिंप्राळ्यातील विकासकामे याचेच फलीत असून भविष्यात शहराचा विकास प्रचंड गतीने होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून जळगाव शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन मंडळातून प्रथमच तब्बल ६२ कोटी रूपयांचा निधी प्रदान करण्यात आला असून अलीकडेच ४२ कोटी मंजूर करण्यात आल्याचे प्रतिपादन केले. आपण उर्वरित ५८ कोटींच्या निधीचा पाठपुरावा करत असून अजून जिल्हा नियोजनमधून भरीव निधी देण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. शहरात मध्यंतरीच्या काळात अनेक अडचणी आल्या. नागरिकांना खरोखरीच अडचणी येत आहेत. यामुळे जळगावला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नागरिकांना वॉटर, मीटर आणि गटर या फक्त मूलभूत सुविधाच आवश्यक आहेत. यामुळे जळगावकरांना किमान प्राथमिक सुविधा तरी मिळाव्यात यासाठी महापालिकेतील पदाधिकार्यांचे प्रयत्न सुरू असल्याबद्दल पालकमंत्र्यांनी कौतुक केले. तर आजपासून सुरू होणार्या विकासकामांच्या माध्यमातून लवकरच पिंप्राळा आणि परिसराचा यातून कायापालट होणार असल्याचा आशावाद देखील ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
व्हिडीओ लिंक : भाग – १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1109896356430320
व्हिडीओ लिंक : भाग – २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/465120535021376
व्हिडीओ लिंक : भाग – ३
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/326858839151936