जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरारी फाउंडेशनतर्फे २३ जानेवारीपासून सागर पार्क, जळगाव येथे आयोजित ५ दिवसीय बहिणाबाई महोत्सवाचे भूमीपूजन सोमवारी सायंकाळी के.के. कॅन्सचे संचालक रजनीकांत कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. यंदाचा हा महोत्सव दिमाखात साजरा होणार असून, त्याचे हे १०वे वर्ष आहे.

भूमीपूजनाच्या कार्यक्रमात रजनीकांत कोठारी यांनी महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला सॅटर्डे क्लबचे व्ही. पी. कुलकर्णी, जयेश पाटील, दीपक पाटील, दिनेश थोरात, शैला चौधरी, गायत्री परदेशी, जयश्री ढगे, सुनंदा मोझे, अर्चना जाधव, चित्रा चौधरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाच्या निमित्ताने खान्देशातील खाद्यपरंपरा आणि लोककलेला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. महोत्सवात भारुड, लावणी यांसारख्या पारंपरिक लोककला तसेच मराठी संस्कृतीवर आधारित फॅशन शोचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात २६० महिला बचत गटांनी स्टॉल्स आरक्षित केले आहेत. महिलांसाठी खेळ पैठणीचा आणि रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहेत. याशिवाय शाळा व महाविद्यालयांतील ६५० स्पर्धक महोत्सवातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणार आहेत. २३ ते २७ जानेवारीदरम्यान हा महोत्सव मनोरंजनासाठी सर्वांसाठी खुला असेल, अशी माहिती अध्यक्ष दीपक परदेशी यांनी दिली. महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, जळगावकरांसाठी हा सांस्कृतिक उत्सव विशेष आकर्षण ठरणार आहे.