मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महात्मा गांधी यांच्याबाबत मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली असून यावरून महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
भिडे गुरूजी यांनी बडनेरा येथील कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत अवमान करणारे वक्तव्य केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी म्हणाले की, हा माणूस एवढे निर्लज्जपणे असे भाष्य करतो आणि समोर बसलेली जनता त्यावर हसते. एका महिलेबद्दल जाहीर कार्यक्रमात घृणास्पद वक्तव्ये केली जातात. तरीही महिला याविरोधात आवाज उठवत नाही. पुरोगामी महाराष्ट्र नुसता बसून आहे, हे अधिक चिंताजनक आहे, असे तुषार गांधी म्हणाले.
दरम्यान, तुषार गांधी म्हणाले की, भिडेंनी महिलांचा घोर अपमान केला आहे. तरीही महिला का गप्प बसून आहेत. महिलांबद्दल घृणास्पद वक्तव्ये केली जातात आणि समोर बसलेले त्यावर हसतात, यात अधिक घृणास्पद काय आहे? जनतेचे अशा वक्तव्यांवर हसणे हे अधिक घृणास्पद आहे. याचे मला दु:ख आहे. चिंता वाटायला हवी तर याची वाटायला हवी. महाराष्ट्राची जनता हे ऐकून बसून राहिली, गप्प बसून राहिली आणि हसतेय. याची खरी चिंता असायला हवी. राष्ट्रपित्याबद्दल, त्याच्या आईबद्दल त्यापेक्षाही महत्त्वाचे एका महिलेबद्दल घृणास्पद वक्तव्ये करूनही यावर राज्याचे मुख्यमंत्री कारवाई करत नाही. चौकशी करून योग्य ती कारवाई करू, एवढेच ते बोलतात. मात्र, ती योग्य कारवाई कधी करणार?, असा जाब त्यांना जनता का विचारत नाही? असे प्रश्न तुषार गांधी यांनी विचारले आहेत.