



बुलढाणा-अमोल सराफ, स्पॉट रिपोर्ट | संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असणारी भेंडवळची घटमांडणी आज अक्षय तृतीयेच्या दुसर्या दिवशी करण्यात आली असून यात यंदा राज्यात पीक परिस्थितीसह पाऊस सर्वसाधारण असेल असे भाकीत वर्तविण्यात आले आहे.
पीक परिस्थिती, पाऊस पाणी, त्याच बरोबर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीच्या माध्यमातून केली जाणारी भविष्यवाणी आज जाहीर करण्यात आली आहे. लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रस्तुत प्रतिनिधीने थेट स्पॉटवर जाऊन आपल्यासाठी याचा वृत्तांत सादर केला आहे.
शेतात खड्डा, खड्ड्यात मातीचा घट , घटात पाणी व त्यावर कुरडया ,त्याच्या बाजूला पान सुपारी व विविध १८ प्रकारची कडधान्ये…. अशा या ‘घटमांडणी’तून वर्षभराचा हंगाम ,पीक पाऊस अर्थव्यवस्था ,संरक्षण व्यवस्था व राजकीय घडामोडीचे भाकित या घटमांडणीतून केले जाते… आज बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकरी दावा करतात की ३५० वर्षांपुर्विपासून अक्षयतृतीयेला ही प्रथा जोपासली जाते, या भविष्यवाणी कडे सर्वांचेच लक्ष लागून असते… या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकर्यांमध्ये मोठी उत्सुकता असते… चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी निरीक्षणे करून हा अंदाज जाहीर केला आहे.
गेल्या वर्षी देशावर कोरोना सारख्या भयंकर रोगाने आक्रमण केलं होत.., येणार्या वर्षभरात नेमकी पावसाची ,पिकांची , देशातील राजकीय स्थिती काय असणार आहे हे या अंदाजानुसार जगासमोर मांडण्यात आले आहे. हे अंदाज किती खरे ठरतात यावर शंका असली व या प्रथेला वैज्ञानिक आधार नसला तरी मात्र शेतकरी यावर मोठा विस्वास ठेऊन आपल्या वर्षभराच शेतीविषयक नियोजन या प्रथेनुसारच करतात…. या वर्षभरासाठीचे भेंडवळ घट मंडणीतील आज जाहीर करण्यात आलेले अंदाज हे खालीलप्रमाणे आहेत.
पीक पाण्याचा अंदाज
भंडवळीच्या मांडणीनुसार या वर्षी कापूस , उडीद , ज्वारी , हरभरा ही पिके चांगली येतील व भाव ही चांगला मिळेल , तर वाटाणा , बाजरी , गहू, करडई ही पिके मध्यम स्वरूपात येतील, देशात पीक चांगले येईल… मात्र पिकांना भाव मिळणार नाही…असा अंदाज करण्यात आलाय…
राजकीय भाकीत
भेंडवळच्या मांडणीनुसार या वर्षी राजा कायम असणार म्हणजे देशात सत्ता पालट होणार नाही, देशाचं संरक्षण चांगलं राहील, परंतु देश आर्थिक अडचणीत असेल, असही सांगण्यात आले आहे.
पावसाचा अंदाज
भेंडवळीच्या अंदाजानुसार यंदा जून महिन्यात कमी पाऊस राहणार आहे. यानंतर जुलै महिन्यात साधारण पाऊस तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस असणार आहे, अवकाळी पाऊस वर्षभर राहणार आहे. यामुळे अर्थातच, अवकाळीचा फटका बसून शेतकर्यांचे काही प्रमाणात नुकसान होणार असल्याचा इशारा यातून देण्यात आलेला आहे.
रोगराई नसेल
तर गेल्या वर्षीप्रमाणे देशात व राज्यात आलेली रोगराई यावर्षी नसणार आहे…असाही अंदाज भेंडवळने व्यक्त केला आहे. विशेष बाब म्हणजे कोरोनाचा प्रकोप सध्या कमी होत असतांना हे भाकीत दिलासा देणारे ठरले आहे.


