यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर व यावल तालुका कृषी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना, मार्गदर्शन व सेवांचा लाभ घेताना अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत चर्चा केली.
यावल तालुका कृषी कार्यालयात मंजूर ६७ पदांपैकी ३८ पदे कार्यरत असून २९ पदे रिक्त आहेत. रावेर तालुका कृषी कार्यालयात मंजूर ६७ पदांपैकी ४० पदे कार्यरत असून २७ पदे रिक्त आहेत. तर यावल तालुका कृषी कार्यालयात मंजूर ६७ पदांपैकी ३८ पदे कार्यरत असून २९ पदे रिक्त आहेत.

अशा प्रकारे दोन्ही कार्यालयांमध्ये एकूण ५६ पदे रिक्त आहेत. यामध्ये कृषी सहाय्यकांची यावल येथे १५ तर रावेर येथे १५, अशी एकूण ३० पदे रिक्त आहेत. मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभागाच्या विविध योजना व शासकीय सेवांची प्रभावी अंमलबजावणी करताना अडचणी येत असून, विभागाच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत आहे. त्यामुळे सदर रिक्त पदे नियमानुसार पदभरती प्रक्रियेद्वारे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी आमदार अमोल जावळे यांनी निवेदनाद्वारे केली.
यावेळी रावेर व यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. पीक विम्याचा लाभ मिळताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व संबंधित प्रश्नांबाबतही कृषिमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले.



