बोहल्यावर चढण्याआधीच मृत्यूने गाठले !

भडगाव प्रतिनिधी | दोन दुचाकींच्या समोरा-समोर झालेल्या भीषण धडकेमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. यातील एका युवकाच्या विवाहाची बोलणी सुरू असतांनाच त्याच्यावर काळाने क्रूर झडप घातल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

या संदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, घाटनांद्रा येथील बबलू उर्फ रामेश्वर शेनपडू मोरे (वय २३) हा सेंधवा येथून, निलेश लाकडिया बारेला (वय २५) याला सोबत घेऊन दुचाकीने (क्र.एम.एच.२०-डी.एन.५९६२) येत होता. भडगाव ते पाचोरा दरम्यान मदरशाजवळ समोरून येणार्‍या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. यात बबलू उर्फ रामेश्वर शेनपडू मोरे व निलेश लाकडिया बारेला हे दोघे जागीच ठार झाले. तर समोरच्या दुचाकीवर असणार्‍या तिघे जखमी झाले असून त्यांनी घटनास्थळावून पळ काढल्याने त्यांची ओळख पटू शकलेली नाही.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच कॉंग्रेसचा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी अपघातस्थळी धाव घेऊन मृतदेह शासकीय रूग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली. दरम्यान, मृत बबलू उर्फ रामेश्‍वर मोरे याच्या विवाहाची बोलणी सुरू होती. मात्र या अपघातामुळे बोहल्यावर चढण्याआधीच त्याला काळाने गाठले. यामुळे मोरे कुटुंबावर आघात झाला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Protected Content