Home क्राईम जळगावच्या आकाशवाणी उड्डाणपुलावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; शाखा अधिकाऱ्याचा चिरडून मृत्यू

जळगावच्या आकाशवाणी उड्डाणपुलावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; शाखा अधिकाऱ्याचा चिरडून मृत्यू

0
9

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी परिसरातील उड्डाणपुलावर गुरुवारी, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार रवींद्र छबुलाल चौधरी (वय ३५, मूळ रा. उत्राण, ता. एरंडोल, ह. मु. चंदूअण्णानगर, जळगाव) यांचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने मृत्यू झाला. ते एका खासगी वित्तीय कंपनीत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. कुटुंबातील एकमेव कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र चौधरी हे मोतीलाल ओसवाल या खासगी वित्तीय कंपनीत शाखा अधिकारी म्हणून काम करत होते. गुरुवारी सकाळी ते एमएच १९ डीएन १२८२ क्रमांकाच्या हिरो एचएफ डिलक्स दुचाकीने कामावर जाण्यासाठी निघाले होते. आकाशवाणी परिसरातील उड्डाणपुलावरून जात असताना आरजे ५० जीए ९२३४ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ते ट्रकच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. अपघातात सहभागी ट्रक आणि दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केली. या घटनेमुळे उड्डाणपुलावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. रवींद्र चौधरी यांच्या पश्चात पत्नी आणि आई असा परिवार आहे. घरातील एकमेव कमावत्या व्यक्तीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाचा मोठा आधार हरपला आहे. अपघाताची बातमी समजताच नातेवाईक आणि सहकाऱ्यांनी रुग्णालयात गर्दी केली. आपल्या जवळच्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता.

दरम्यान, तरसोद बायपासची वाहतूक वळविल्यानंतर जळगाव शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचा ताण आणि अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आकाशवाणी उड्डाणपुलावर झालेल्या या अपघातामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण, अवजड वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन आणि अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. संबंधित यंत्रणांनी या मार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


Protected Content

Play sound