श्रमदानातून सुरू झाला खा. उन्मेष पाटील यांचा ‘गिरणा वॉटर कप’ !

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार उन्मेषदादा पाटील यांनी जाहीर केलेल्या ‘गिरणा वॉटर कप’ या स्पर्धेस आजपासून अभिनेता तथा पर्यावरणवादी सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत श्रमदान करून प्रारंभ झाला.

गिरणा नदीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आधी गिरणा परिक्रमा करून यातील सर्व समस्या जाणून घेतल्या. यानंतर त्यांनी महाराष्ट्र दिनापासून गिरणा वॉटर कप ही अनोखी स्पर्धा आयोजीत केली आहे. यात गिरणा खोर्‍यातील गावांमधील ग्रामस्थ सहभागी होणार आहेत. यामध्ये श्रमदानातून वृक्षसंवर्धन, जलसंधारण तसेच अन्य पर्यावरणाशी अनुकुल असणारी कामे करण्यात येणार आहेत. आज भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथून गिरणा वॉटर कप या स्पर्धेस प्रारंभ झाला आहे.

याप्रसंगी माजी मंत्री आ. गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, अभिनेता सयाजी शिंदे, युवा नेते अमोल महाजन यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. खासदार पाटील यांनी आझादी का अमृत महोत्सव याच्या अंतर्गत गिरणा वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केल्याचे प्रतिपादन केले. आ. गिरीश महाजन यांनी या अनोख्या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. तर अभिनेते सयाजी शिंदे यांनी या परिसरातील प्रत्येक गावात वृक्षारोपण करून स्वातंत्र्य दिनी गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करतांना या जगलेल्या वृक्षांनाही सलाम करावा असे खासदार उन्मेष पाटील यांना सुचविले असता, त्यांनी याला तातडीने होकार दिला. यातूनच आजपासून गिरणा वॉटर कप स्पर्धेस प्रारंभ झाला आहे.

Protected Content