राज ठाकरेंच्या सभेआधी शिवसेना मनसेत जुंपली !

औरंगाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेची उत्सुकता शिगेला पोहचली असतांना याआधी शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आधी जाहीर केल्यानुसार आज त्यांची औरंगाबाद येथे सभा होत आहे. याआधी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शोले चित्रपटातील असरानी सारखे असल्याची टीका केली आहे. अर्ध्यांनी भाजपवर हल्ला करा, अर्ध्यांनी मनसेवर आणि आम्ही घरात बसून राहू अशी त्यांची अवस्था झाल्याचा टोला त्यांनी मारला.

यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मनसेच्या सभेसाठी पैसे देऊन माणसे बोलावण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. औरंगाबाद हा शिवसेनेचा गड असून हा गड स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केला आहे. शिवसेनेचं पानिपत करण्याची हिंमत कोणामध्येच नाही, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कोणीही बरोबरी करू नये, असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांच्या सभेला कितीही नागरिक आले तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही. कारण औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा गड आहे आणि तो शिवसेनेचाच गड राहील, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

दरम्यान, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी देखील मनसेला लक्ष्य केले आहे. येथे शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना देसाई म्हणाले की, बाबरी मशीद पाडल्यानंतर भाजपा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर याचा मला अभिमान आहे म्हटलं होतं. बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी सर्वप्रथम शिवसेनेने घेतली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी कोण आहे हे शिवसेनेला सांगायची गरज नाही. तर मनसेची आजची सभा ही सुपारी सभा असल्याची टीका देखील त्यांनी केली.

Protected Content