जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मारोती पेठ येथील सोने चांदीचे दागिने बनविणाऱ्या दोन व्यापाऱ्यांची ५ लाख ७४ हजारांमध्ये फसवणूक केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील संशयित बंगाली कारागिराला पंजाब राज्यातून शनीपेठ पोलीसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
बापन मंटू कारक (वय- २८ रा. पश्चिम बंगाल, ह.मु. मारोतीपेठ जळगाव) असे फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “शहरातील मारोती पेठ येथील रहिवासी सुशांत तारकनाथ भुतका (वय-४२) यांचे राहत असलेल्या परिसरात त्यांचा सोने-चांदीचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात बापन मंटू कारक १५ वर्षांपासून सोने चांदीचे दागिणे बनविण्याचे काम करत होता. दरम्यान त्याने विश्वास संपादन करुन घरबांधकामासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगत कारखान्याचे मालक सुशांत भुतका यांच्याकडून २ लाख ६० हजार रुपये घेतले. यासह त्याने दिपक संघवी यांच्याकडूनही ३ लाख १४ हजार रुपयांचे दागिणे बनिवण्यासाठी घेतले होते.
एके दिवशी बापन कारक हा दिसून आला नाही. सर्वत्र शोध घेतला मात्र मिळून आला नाही; तसेच त्याच्याशी संपर्कही केला मात्र संपर्कही झाला नाही. सुशांत भुतका यांच्याकडून घेतलेले २ लाख ६० हजार रुपये व दिपक संघवी यांचे ३ लाख १४ हजार रुपये असे एकूण ५ लाख ७४ हजार रुपयांत बापन कारक याने फसवणूक केली होती. याप्रकरणी दोन महिन्यांनंतर सुशांत भुतका यांनी बापन कारक याच्याविरोधात शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फरार संशयित बापन कारक हा पंजाबमधील भटिंडा येथे असल्याची गोपनिय माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांना मिळाली. त्यांनी रविंद्र बोदवडे, अमोल विसपुते व राहुल घेटे यांचे पथकाने संशयिताला अटक केली आहे. सोमवारी १३ जून रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला १६ जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.