जळगाव (प्रतिनिधी) भुसावळ व जळगाव तालुक्यातील वनजमिन घोटाळ्यातील फरार आरोप जळगावात मोकाट फिरत असून पोलीस राजकीय दबावापोटी अटक करण्यात येत नसल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते कल्पेश भोईटे यांनी केला आहे. या प्रकरणी आपण पोलीस अधीक्षकांना तक्रारी अर्ज करून देखील होत नसल्याने आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचेदेखील श्री.भोईटे यांनी म्हटले आहे.
या संदर्भात अधिक असे की, भुसावळ व जळगाव तालुक्यातील वनजमिनी भूमिहिनांना दाखवून अस्तित्वात नसलेल्या गटांच्या नावाने बनावट सातबारा उतारे तयार करून जमिनींची परस्पर विक्री करीत ९ कोटी रुपयांची फसवणूक व अपहार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन तब्बल साडेतीन महिने झाले आहेत. याप्रकरणी शहरातील दोन पोलिस ठाण्यांमध्ये तीन गुन्हे दाखल करून यातील १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील सात जणांना पोलिसांनी अटक केलीय तर उर्वरित आरोपी फरार आहेत. या संदर्भात कल्पेश भोईटे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, वनजमीन घोटाळ्यातील आरोपी अॅड.प्रदीप कुलकर्णी यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालय व खंडपीठाने फेटाळलेला आहे. असे असतांना देखील अॅड.कुलकर्णी हे जळगावात पोलिसांच्या नाकावर टिच्चून कोर्टात येतात व आपले कामकाज करतात. इतर गुन्ह्यातील आरोपींना पोलीस लागलीच अटक करतात. मग अॅड.प्रदीप कुलकर्णी यांच्यावर मेहरबानी का? असा सवाल देखील श्री.भोईटे यांनी विचारला असून पोलिसांनी या प्रकरणी लवकर कारवाई न केल्यास आपण न्यायालयात दाद मागू असे देखील म्हटले आहे.