धरणगाव बालाजी मंदिर सभागृह भूमिपूजन सोहळ्याच्या बॅनरवरून वाद

088381e3 357c 42c8 a393 f89e882a96fb

धरणगाव (प्रतिनिधी) शहराचे आराध्य दैवत श्री बालाजी महाराज मंदिराच्या सभागृह भूमिपूजन सोहळ्याचे नुकतेच उद्घाटन झाले. परंतू भूमिपूजन सोहळ्याच्या प्रसिद्धी बॅनरवरून आता वाद उफाळून आला आहे. बालाजी वाहन प्रसारक मंडळ हे कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही. त्यामुळे त्याला राजकीय पक्षाचे व्यासपीठ बनविणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया शहरातील अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे. तसेच बॅनरवर चक्क बालाजी महाराज यांचाच फोटो नसल्यानेही काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.

या संदर्भात अधिक असे की, १६५ वर्षाची परंपरा असलेले शहराचे आराध्य दैवत श्री बालाजी महाराज यांच्या मंदिराच्या सभागृह भूमिपूजन सोहळ्याचे नुकतेच उद्घाटन झाले. पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावळ आणि पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा झाला. दरम्यान, भूमिपूजन सोहळ्याच्या निमंत्रणासाठी सोशल मिडियावर व्हायरल करण्यासाठी एक बॅनर बनविण्यात आले होते. या बॅनरवर स्व. बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ना.गिरीश महाजन, आदित्य ठाकरे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांचे फोटो आहेत. यामुळे गावाच्या चांगल्या कार्यक्रमाला राजकीय रंग प्राप्त झाला. यावरच बालाजी वाहन प्रसारक मंडळातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

देवाच्या कार्यक्रमाला राजकीय देणे चुकीचे : डी.जी.पाटील

शहराचे आराध्य दैवत श्री बालाजी महाराज वाहन प्रसारक मंडळात सर्वपक्षीय नेते,कार्यकर्ते समाविष्ट आहेत. त्यामुळे मंडळाला राजकीय रंग देणे चुकीचे असल्याचे मत कॉंग्रेसचे प्रदेश सचिव तसेच मंडळाचे सदस्य डी.जी.पाटील यांनी व्यक्त केले आहे. बालाजी वाहन प्रसारक मंडळात सर्वपक्षीय राजकीय नेते असतांना भूमिपूजन सोहळ्याच्या बॅनरवर फक्त शिवसेना-भाजपच्या राज्य,राष्ट्रीय नेत्यांची फोटो टाकण्यात आली. वास्तविक हा संपूर्ण गावाचा कार्यक्रम होता. त्यात राजकीय विषय घ्यायलाच नको होता.

वास्तविक बघता राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला म्हणून यावर फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावळ आणि पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे फोटो अपेक्षित होते. इतर नेत्यांची फोटो टाकल्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्यांचीच फोटो का टाकण्यात आली नाहीत? यावर आमची नाराजी असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे प्रश्न उपस्थित करणे देखील स्वाभाविक आहे. याबाबत मी माझी नाराजी मंडळाकडे स्पष्ट शब्दात नोंदवली आहे.

गावाच्या कार्यक्रमाला देण्यात आलेला राजकीय रंग दुर्दैवी : ज्ञानेश्वर महाजन

शहराचे आराध्य दैवत श्री बालाजी महाराज वाहन प्रसारक मंडळ हे संपूर्ण धरणगावकरांचे आहे. गावातील सर्वसामान्य माणूस देखील मंडळास देणगी देतो. म्हणून या मंडळात सर्व राजकीय पदाधिकारी आहेत. त्यामुळे बालाजी महाराज मंदिर सभागृह भूमिपूजन कार्यक्रमाला राजकीय रंग देणे, दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी व्यक्त केली आहे.

राज्य शासनाने निधी दिला म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावळ आणि पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे फोटो आवश्यक आहेत. परंतू इतर नेत्यांचे फोटो टाकल्यामुळे शरद पवार आणि सोनिया गांधी यांचा फोटो पाहिजे होता. आज त्यांची सत्ता आहे. उद्या आमची सत्ता राज्यात आल्यावर मग पुढील निधी मागण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही कसं जाऊ शकू? गावातील लोकांची मदत देखील मंदिर उभारणीच्या कार्यक्रमाला आवश्यकता आहे. उद्या आम्ही निधी गोळा करण्यासाठी गावात फिरु त्यावेळी कार्यकर्ते आम्हाला आमच्या नेत्यांच्या अवमानाचा जाब विचारणार नाहीत का? त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचा आदर राखणे गरजेचे होते.  किंबहुना यात राजकीय प्रसिद्धी टाळली असती तर अधिक बरे झाले असते. तसेच झालेला प्रकार दुर्दैवी आहे, असे देखील श्री.महाजन यांनी म्हटले आहे.

बॅनरवर बालाजी महाराजांचा फोटो नसणे हे धक्कादायक : संजय महाजन

बालाजी महाराज यांच्या मंदिराच्या सभागृह भूमिपूजन सोहळ्याच्या बॅनरवर चक्क बालाजी महाराज यांचाच फोटो नसल्याने भाजप तालुकाध्य अॅड. संजय महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या देवाच्या नावाने मंदिर उभारणी सुरु आहे. त्याच देवाचा फोटो बॅनरवर नसणे हे अत्यंत धक्कादायक आहे. वास्तविक देवा पेक्षा कुणीही मोठा नाही. मंडळाच्या लोकांनी त्यांच्या स्वतःच्या फोटो ऐवजी बॅनरमध्ये बालाजी महाराजांचा भव्य फोटो टाकला पाहिजे होता. कार्यक्रमाची प्रसिद्धी आवश्यक आहे. मात्र, देवाचा फोटो नसणे, म्हणजे हा बालाजी महाराजांचा एक प्रकारे अपमान आहे. यापुढे मंडळ काळजी घेईल,अशी अपेक्षा आहे. याबाबत मी माझी नाराजी बोलून दाखवली आहे.

Protected Content