महापालिकेवर दोन वर्षासाठी प्रशासक नियुक्त करावा (व्हिडिओ )

 

जळगाव,प्रतिनिधी । महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे जाहीरनाम्याद्वारे आमिषे दाखविण्यात आली होती. दोन वर्ष उलटून देखील त्यातील आश्वासनांची सत्ताधाऱ्यांनी पूर्तता केलेली नसून याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात असल्याचे विरोधी पक्ष नेता सुनील महाजन यांनी सांगितले असून विकास कामे होत नसल्याने महापालिकेवर दोन वर्षासाठी प्रशासक नियुक्त करावा अशी मागणी केली आहे. तर महापालिकेत पुढील महापौर शिवसेनेचा झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये असे मत जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी व्यक्त केले.

शहराची वाढती गंभीर परिस्थिती पाहता आम्ही ना. गुलाबराव पाटील व नाथाभाऊ या दोघांना शहराकडे लक्ष देऊन शहराचा बॅकलॉग भरून काढावा जेणेकरून शहरावासीयांवर अन्याय होणार नाही, शहर १०-१५ वर्ष मागे गेले असून ते पुन्हा एकदा भरभराटीच्या दिशेने जाईल अशी भावना सुनील महाजन यांनी व्यक्त केली.  या बैठकीत जळगाव मनपा बारखास्ती संदर्भात कुठलीही चर्चा झाली नसल्याचे महाजन यांनी सांगितले. मात्र, जळगाव महापालिका बरखास्त झाली पाहिजे अशी विरोधी पक्ष नेता म्हणून आपली भूमिका असल्याचे स्पष्ट केले. जनतेला जर प्राथमिक सुविधा देखील पुरवू शकत नसू तर अशी महापालिका बरखास्त करणेच योग्य आहे. या महापालिकेवर आयएएस दर्जाचा कमीत कमी दोन वर्षासाठी प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी अशी आपली मागणी असल्याचेही श्री. महाजन यांनी सांगितले.

तर चमत्कार घडल्यास आश्चर्य वाटू देऊ नये – नितीन लढ्ढा

एकनाथराव खडसे यांच्या भेटीबाबत जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, जळगाव शहरातील रस्ते, गटारीच्या समस्यांबाबत अनेक नागरिकांनी नाथभाऊंकडे तक्रार केलेली आहे. १०० कोटी निधीचे नियोजनाबाबत नाथाभाऊ यांनी विचारणा केली असता त्यांना या निधीचे नियोजन केवळ कागदोपत्री झाले असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.  १०० कोटी पैकी ४८ कोटींच्या कामांची निविदा राज्य सरकारच्या समितीने रद्द केल्या असून ते पुन्हा निविदा काढण्याचा निर्णय दिल्याने मात्र, निधीच उपलब्ध नसल्याने जळगाव शहराचा विकास कसा साध्य होईल असा प्रश्न श्री. लढ्ढा यांनी उपस्थित केला. १०० कोटींचा निधी मनपा खजिन्यात आले नसल्याने नाथाभाऊ यांनी आश्चर्य व्यक्त करून तुमची परिस्थिती सुधारणार कशी असा प्रश्न नाथाभाऊ यांनी विचारला. मनपाच्या उत्पन्नाची संसाधने कमी होत आहेत. गाळेधारकांना राज्यात व महापालिकेत सत्ता असतांना देखील न्याय मिळू शकलेला नाही. सर्वच घटकांचा अपेक्षाभंग झाला आहे. स्थायी समिती सभापती निवडणुकीवेळी अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात होते असा गौप्यस्फोट करत आम्हाला घोडेबाजार करायचा नव्हता असे सांगितले. मात्र, आगामी महापौर निवडणुकीत काही चमत्कार घडला तर आश्चर्य वाटू नये असे सूचक वक्तव्य नितीन लढ्ढा यांनी केले.

https://www.facebook.com/508992935887325/posts/3310873732365884/

Protected Content