शरद पवार निर्णय घेत नाहीत तोवर राजीनामा झाला नसता — चंद्रकांत पाटील

 

मुंबई : वृत्तसंस्था । शरद पवार निर्णय घेत नाहीत तोवर राजीनामा झाला नसता. त्यामुळे मी समाधान करतो. शरद पवारांनी संवेदनशीलतेने सीबीआयचा तपास लागल्यावर मंत्रीपदावर राहता येत नाही याची जाणीव ठेवून निर्णय घेतला आहे,” असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून तो मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आला. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान सतत राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपाकडून यावर प्रतिक्रिया आली आहे.

 

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “जे जे चुकेल त्याला शासन आहे, तोपर्यंत लोकशाही सदृढ होणार नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनात शंक होती. पवारांच्या घरी बैठक आहे, काय निर्णय घेतील? धनंजय मुंडेंच्या वेळीही सहा तास पवारांच्या घरी बैठक चालली. पण शेवटी धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत असा निर्णय झाला”.

 

 

 

“परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतरदेखील शरद पवारांकडे बैठक झाली. त्यावेळी राजीनामा न घेण्याचा निर्णय झाला. शरद पवारांनी बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. पण खोटं पडल्यानंतर त्यांनी बोलणंच बंद केलं , असेही चंद्रकांत पाटील म्हणाले .

 

 

न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले असल्याने गृहमंत्री पदावर राहणं मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे असं अनिल देशमुख यांनी ट्विट करत सांगितलं आहे.

 

“मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर शरद पवार यांनी होकार दिला. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा दिला असून, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला ते निघाले . मुख्यमंत्र्यांना भेटून ते त्यांच्या पदाचा राजीनामा देणार ” अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली

Protected Content