फलक काढण्यासाठी तृप्ती देसाई शिर्डीला रवाना

पुणे प्रतिनिधी । शिर्डी येथील ड्रेस कोडबाबतचा फलक काढण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आज तेथे जाण्यासाठी निघाला असून यामुळे शिर्डीत कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

लॉकडाऊन नंतर शिर्डीमधील साई मंदिरही दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तसा फलकच मंदिराबाहेर लावण्यात आला आहे. मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा असं आवाहन संस्थानकडून करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार मिळाल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे. याला तृप्ती देसाई यांनी विरोध केला आहे.

तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येऊन साई संस्थानाने लावलेला आवाहनाचा फलक काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार तृप्ती देसाई पुणे येथून शिर्डीसाठी रवाना झाल्या आहेत. दरम्यान तृप्ती देसाई शिर्डीत येणार असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

शिर्डी येथील मंदिर आवारामधील महिलांच्या वेशभूषेबाबत जो बोर्ड लावण्यात आला आहे. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही तिथे जाऊन लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. तो बोर्ड लवकरात लवकर लवकर हटवला जावा, अन्यथा आम्ही आणखी तीव्र लढा उभारणार, असा इशारा तृप्ती देसाई यांनी शिर्डीसाठी निघतांना दिला आहे.

Protected Content