भुसावळ प्रतिनिधी | राज्यातील महाविकास आघाडीने बंद पुकारला असतांना याला तालुक्यातील वरणगाव येथे मात्र याला गालबोट लागले. येथे भाजप आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी एकमेकांना भिडल्याने तणाव निर्माण झाला असून माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह इतरांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये महा विकास आघाडीने पुकारलेल्या आजच्या बंदला गालबोट लागले आहे महा विकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले, भाजप कार्यकर्त्यांमध्ये व महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाली आणि दोन्ही पक्षाचे काही कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत,भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे विकास आघाडीच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला होता या बंदला महा विकास आघाडीचे कार्यकर्ते शांततेत पाळण्याचे आवाहन करत असताना भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे बंद पाळू नका असे आवाहन करत होते ,दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने राडा झाला व कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आता हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.
दरम्यान, या संदर्भात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा गटनेते राजेंद्र चौधरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी सुनील काळे यांना मारहाण केली नसून हा आगामी निवडणुकीसाठी स्टंट असल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी नितीन देशमुख यांनी देखील अशा प्रकारचा हल्ला झाला नसून हा केवळ बोलचालीचा प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे दीपक मराठे यांचा रक्तदाब वाढला असून महेश सोनवणे यांची सोन्याची चेन गायब झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपचे पदाधिकारी गजानन वंजारी यांनी सुनील काळे यांच्यावर सुमारे १०० जणांचा जमाव चाल करून आल्याचा आरोप केला. यातील राष्ट्रवादीच्या सुमारे ३–३५ जणांनी त्यांच्यावर हल्ला चढविल्याने ते जखमी झाल्याचा आरोप केला आहे. तर, भाजपचे शहराध्यक्ष सुनील माळी यांनी जमावाने सुनील काळे, डॉ. साजीद आणि शंकर पवार यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप केला. हा नियोजीत प्लॅन असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, ताज्या वृत्तानुसार सुनील काळे, दीपक मराठे यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने तणावाचे वातावरण निवळले आहे. मात्र आगामी निवडणुकीतील खुन्नसची ही चुणूक असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.