जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाने अलीकडेच थोर पुरूषांच्या यादीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश केला असल्याने शासकीय पातळीवरून त्यांची जयंती पहिल्यांदाच साजरी होणार आहे. विशेष बाब म्हणजे ही मागणी सहकार राज्यमंत्री असतांनाच ना. गुलाबराव पाटील यांनी केली होती. त्यांच्या मागणीला राज्य सरकारने स्वीकृती दिल्याने समस्त शिवसैनिकांसाठी ही जयंती स्पेशल मानली जात आहे.
याबाबत वृत्त असे की, राज्य सरकारने गेल्या आठवड्यात थोर पुरूषांच्या यादीत सुधारणा केली होती. यात प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अन्य महापुरूषांच्या नावांचा समावेश करण्यात आला होता. यामुळे या सर्व मान्यवरांची जयंती आणि पुण्यतिथी शासकीय पातळीवर साजरी करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.
या अनुषंगाने शनिवार दिनांक २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती उत्सव हा शासकीय पातळीवरून साजरा होणार आहे. यात प्रत्येक शासकीय कार्यालयात प्रतिमा पूजनाचे आयोजन करण्यात आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शासकीय पातळीवरून साजरी करण्यात यावी ही मागणी ना. गुलाबराव पाटील यांनी आधीच्या सरकारमध्ये सहकार राज्यमंत्री असतांना केली होती. ही मागणी तेव्हा मंजूर झाली नसली तरी अलीकडेच यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अर्थात, ना. गुलाबराव पाटील यांच्या मागणीला यश आले असून बाळासाहेब ठाकरे यांना शासकीय पातळीवरून अभिवादन करण्यात येणार असून शनिवारी याला प्रारंभ होणार आहे.
या संदर्भात जयंतीच्या पूर्वसंध्येला बोलतांना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री म्हणाले की, ज्यांच्या विचारांवरून आपण राजकारणात सक्रीय झालोत ते हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती व पुण्यतिथी शासकीय पातळीवरून साजरी करण्यात यावी हे आपले कधीपासूनचे स्वप्न होते. सहकार राज्यमंत्री असतांना केलेली मागणी ही तेव्हाच्या सरकारने मान्य केली नसली तरी याला आता महाविकास आघाडी सरकारने मान्यता दिल्याचे आपल्याला समाधान आहे. सर्व शिवसैनिक व बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थक आणि सर्व शासकीय कार्यालयांमध्ये उत्साहात जयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासियांना केले आहे.
आजवर बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ही समस्त शिवसैनिक मोठ्या उत्साहात साजरी करत होते. गत जयंतीला महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांना अभिवादन करून याची व्याप्ती वाढविली. तर यंदा सर्व राज्यात शासकीय पातळीवर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येणार असल्याने ही जयंती सर्व शिवसैनिकांसाठी स्पेशल बनल्याची भावना व्यक्त केली जात आहे.