एबीपी न्यूज-सी वोटरच्या ओपिनियन पोलमध्ये एनडीएराज कायम राहण्याचा कल

नवी दिल्ली-काल प्रसिद्ध झालेल्या एबीपी न्यूज-सी वोटरच्या ओपिनियन पोलमध्ये बिहारमध्ये एनडीएराज कायम राहण्याचा कल समोर आला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस उरले आहेत. दरम्यान, बिहारमधील विधानसभेचा संभाव्य कल दाखवणारे ओपिनियन पोल प्रसिद्ध होऊ लागले आहेत. दरम्यान, एबीपी न्यूज – सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवली आहे. या पोलनुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला १३५ ते १५९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाआघाडीला ७७ ते ९८ जागा मिळण्याची शक्यता आहे. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीला केवळ १ ते ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांच्या खात्यात ४ ते ८ जागा जाऊ शकतात.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबर रोजी, दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबर रोजी आणि तिसऱ्या टप्प्यात ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होईल.

Protected Content