पुण्यात आज ‘महाजनादेश यात्रा’

pune

 

पुणे प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर महाजनादेश यात्रा काढली असून, ही यात्रा आज पुरंदर मतदारसंघातून संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास शेवाळवाडी फाटा येथून हडपसर गाडीतळाकडे मार्गस्थ होणार आहे. तसेच शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खासदार भोसले यांच्या प्रवेशासाठी मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी रात्री दिल्लीसाठी रवाना झाले असून, आज सकाळी प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री लगेच शिर्डी येथील विमानतळावर सकाळी 11 वाजेच्या सुमारास पोहोचतील आणि त्यानंतर नियोजित महाजनादेश यात्रेस प्रारंभ होईल आहे. महाजनादेश यात्रा मगरपट्टा चौकमार्गे रामटेकडी, गोळीबार मैदान, स्वारगेट येथून सारसबागेला वळसा घालून टिळक रस्त्याने यात्रा टिळक चौकात पोहोचेल. त्यानंतर यात्रा लालबहाद्दूर शास्त्री रस्त्याने म्हात्रे पूलमार्गे नळ स्टॉपला पोहोचेल. तेथून पुढे यात्रा कर्वे रस्त्याने नामदार गोपाळकृष्ण गोखले मार्गावर (एफसी रोड) येणार आहे. गोखले रस्त्याने यात्रा कृषी महाविद्यालय चौकात उजवीकडे वळून संचेती हॉस्पिटलच्या चौकात पोहोचणार आहे. ही यात्रा त्यानंतर येरवड्याच्या दिशेने जाणार आहे. येरवड्यातून निघालेल्या यात्रेची नगररस्ता मार्गाने चंदननगर येथे समाप्ती होणार आहे. यात्रेच्या स्वागताची जबाबदारी भारतीय जनता युवा मोर्चावर सोपविण्यात आली असून, शहराध्यक्ष दीपक पोटे यात्रेच्या स्वागतासाठी दुचाकी रॅली काढणार आहेत. जवळपास ४३ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर मुख्यमंत्र्यांचे तब्बल ५६ ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. या सर्व ५६ ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी गोळा करण्याची जबाबदारी ही स्थानिक आमदार आणि नगरसेवकांवर सोपविण्यात आली आहे.

Protected Content