शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत मंत्रिपदाची शपथ घेणार

arvind sawant

 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार अरविंद सावंत आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद सांवत यांचे नाव मंत्रिपदासाठी दिले आहे. त्यामुळे आज संध्याकाळी सावंत मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

 

दरम्यान, खासदार अरविंद सावंत भल्या पहाटे त्यांच्या शिवडी इथल्या घरातून दिल्लीसाठी रवाना झाले. अरविंद सावंत यांचं कुटुंबही शपथविधीसाठी दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्रीदेखील शपथ घेतील. एनडीएमधील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. शिवसेनेला गेल्या काही दिवसांपासून तीन मंत्रिपदे आणि एक उपसभापतीपद मिळेल अशी चर्चा होती. यामध्ये अरविंद सावंत यांच्यासह संजय राऊत यांना उपसभापतीपद आणि गजानन किर्तीकर यांना मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे वृत्त होते. मात्र, पहिल्या टप्प्यात एनडीएतील मित्रपक्षांना एकच मंत्रीपद देण्याचे ठरविण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content