वैभव संलनाद्वारे पंतप्रधान मोदी साधणार अनिवासी भारतीय संशोधकांसोबत संवाद

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । महात्मा गांधी जयतींदिनी जागतिक भारतीय वैज्ञानिक (वैभव) शिखर संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. या संमेलनात जागतिक आणि अनिवासी भारतीय संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांना एकाच मंचावर आणणार आहे.

भारतीय वंशाच्या जगभरातील दिग्गजांना एकाच मंचावर आणणे हाच या संमेलनाचा उद्देश असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. हे संशोधक जगभरातील विविध महत्वाच्या संस्था आणि संशोधन संस्थांशी संबंधित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या संमेलनाचे उद्घाटन करतील. हे जागतिक भारतीय वैज्ञानिक (वैभव) शिखर संमेलन ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

५५ देशांमधील वैज्ञानिक होणार सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या संमेलनाची माहिती दिली. आपण या संमेलनात भाग घेण्यास उत्सुक असून हे संमेलन भारतीय वंशाच्या जागतिक वैज्ञानिक आणि संशोधकांना एकत्र आणण्याचे काम करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. सर्वांनी २ ऑक्टोबरला संध्याकाळी ६.३० वाजता या कार्यक्रमात सहभागी व्हा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. विशेष म्हणजे या शिखर संमेलनाला जगातील एकूण ५५ देशांमधील भारतीय वंशाचे ३००० वैज्ञानिक-शिक्षणतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या बरोबरच सुमारे १० हजारांहून अधिक अनिवासी भारतीय आणि शिक्षणज्ज्ञ देखील या संमेलनात भाग घेत आहेत.

Protected Content