पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील ओत्तर गल्लीतील बाबा ज्युडियाराम साहेब मंदिरात १३ एप्रिलपासून सुरू झालेल्या वार्षिक महोत्सवाची सांगता १५ एप्रिल रोजी भव्य भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या तीन दिवसांच्या उत्सवात हवन, भजन, नाटिका, अखंड पाठ व महाआरतीसह अनेक भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
उत्सवाची सुरुवात १३ एप्रिल रोजी हवन यज्ञाने झाली, त्यानंतर धुळे येथील छमाछम झुलेलाल भजन मंडळीने भक्तिरसात न्हालेल्या संगीतमय सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. १४ एप्रिल रोजी महिलांसाठी आयोजित “एक शाम बाबा के नाम” या कार्यक्रमात बाबांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करण्यात आली.
१५ एप्रिल रोजी सकाळी पंचामृत अभिषेक, संध्याकाळी महिला मंडळाचा रंगतदार कार्यक्रम आणि रात्री अखंड पाठाचा भोग साहेब, महाआरती आणि पल्लव साहेब यांच्या हस्ते सांगता सोहळा पार पडला. नंदुरबार, जळगाव, धुळे, इंदौर, दोंडाईचा यांसह इतर ठिकाणांहून आलेल्या हजारो भाविकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
विशेष आकर्षण: बाबांच्या नातूंची उपस्थिती
या महोत्सवात बाबा ज्युडियाराम साहेब यांचे नातू सांई हिरानंदजी व त्यांच्या पत्नी निलमदेवी यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी बाबांच्या पादुकांनाही भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
या यशस्वी आयोजनासाठी जय झुलेलाल सिंधी पंचायत, सिंधी नवयुवक मंडळ आणि भक्त परिवाराचे विशेष योगदान होते. या उत्सवाच्या माध्यमातून विश्वात सुख, शांती आणि समाधान नांदावे, असा संकल्प महाआरतीवेळी करण्यात आला.