सावदा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सावदा शहरातील अवैध दारू व जुगार व्यवसायाविरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी पत्रकार संघाचे सचिव रमाकांत तायडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उपोषण सुरू केले होते. पोलीस प्रशासनाने त्यांच्याशी संवाद साधून आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.
रमाकांत तायडे यांनी 15 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उपोषण सुरू केले होते. त्यांच्या या उपोषणाची दखल घेत सावदा पोलीस स्टेशनच्या वतीने उपोषण स्थळी भेट देत संवाद साधण्यात आला. अखेर १६ एप्रिल रोजी संध्याकाळी पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर रमाकांत तायडे यांनी उपोषण मागे घेतले. सावदा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू व जुगारविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. वर्ष 2024 मध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या 90 इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, 2.43 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच, जुगार प्रकरणांमध्ये 24 गुन्हे दाखल करून सुमारे 2.79 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सन 2025 मध्ये आतापर्यंत 25 दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करत 10.48 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे, तसेच 11 जुगार प्रकरणांत 14,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाच्या या कारवाईमुळे रमाकांत तायडे यांनी समाधान व्यक्त करत उपोषण मागे घेतले. पुढेही अवैध धंद्यांविरोधात वेळोवेळी कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलीस निरीक्षकांनी विशाल पाटील व्यक्त केला.