मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनसे प्रमुख राज ठाकरे यांच बहुचर्चीत अयोध्या दौरा रद्द होण्याची शक्यता असून याबाबत आज अधिकृत घोषणा होऊ शकते.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र या आगामी दौर्याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौर्याला उत्तर प्रदेशातल्या भाजपा नेत्याकडून विरोध होत असतानाच आता या दौर्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. यामागचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी राज ठाकरेंची तब्येत बिघडल्याने हा दौरा स्थगित झाला असल्याचे मानले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातले भाजपा नेते बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या या दौर्याला तीव्र विरोध केला आहे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी तरच त्यांना अयोध्येत येता येईल, अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे. मुंबई भाजपाचे प्रवक्ते संजय ठाकूर यांनी राज ठाकरेंनी फेरीवाले, टॅक्सीवाले, मजूर आणि सर्व कष्टकरी वर्गाची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या अयोध्या दौर्याला आमचा कडाडून विरोध असेल, असा इशारा दिला आहे.
आगामी निवडणुकांच्या आधी उत्तर भारतीय मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता असल्याचे आता दिसून येत आहे. यामुळे मनसे सोबत जाणे हे मुंबईत भाजपला घातक ठरू शकते असा एक मतप्रवाह आहे. या पार्श्वभूमिवर, राज्यातील भाजप नेत्यांनी सावध भूमिका घेतली असतांनाच राज ठाकरे यांनी दौरा स्थगित केल्याचे समोर येत असून याबाबत आजच अधिकृत घोषणा होऊ शकते.