धरणगाव प्रतिनिधी । गाव हा ग्रामीण व्यवस्थेतील महत्वाचा घटक असून याच्या विकासकामांना गती देण्यात येत आहे. विकासकामांसाठी आवश्यक असणारा पाठपुरावा आणि यासाठी लागणार्या निधीत कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देणार नसून गरजेनुसार निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील सोनवद आणि अंजनविहिरे येथे विकासकामांचे लोकार्पण व भूमिपुजन तसेच शिवसेना, युवासेना आणि महिला शिवसेनेच्या शाखेच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील होते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते सोनवद आणि अंजनविहिरे येथील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन करण्यात आले. यात सोनवद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या संरक्षक भिंतीचे लोकार्पण तसेच सिमेंट बंधार्याचे जलपूजन करण्यात आले. तसेच येथे पेव्हर ब्लॉकचे भूमिपुजन आणि संजय गांधी निराधार योजना आणि श्रवणबाळ योजनेतील २० लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र प्रदान करण्यात आले. तर अंजनविहिरे येथे ग्रामपंचायतीच्या जवळच्या झिरी नदीवरील कॉंक्रीट बंधार्याचे भूमिपुजन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
याच कार्यक्रमात युवासेना शाखा आणि महिला शिवसेना शाखेचे उदघाटन देखील ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. तर युवासेनेची शाखा कार्यकारणी देखील जाहीर करण्यात आली. यात शाखाप्रमुख संभाजी पाटील, उपशाखाप्रमुख सुजन पाटील, सचिव गिरीश कोळी आणि किरण डोळे यांचा समावेश आहे. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्रीधर डोळे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. त्यांचे ना. गुलाबराव पाटील व शिवसेना पदाधिकारी यांनी स्वागत केले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, पं स सभापती प्रेमराज पाटील , जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन पाटील यांनी आपल्या मनोगतांमधून ना. गुलाबरावजी पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरू झाल्याचे नमूद केले.
ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कोविडच्या काळातही निधीची कोणतीही कमतरता पडू न देता मतदारसंघात विकासकामे सुरू करण्यात आलेली आहेत. शिवसेनेने जनहिताचा विडा उचलला असून युवासेना आणि महिला सेनेच्या माध्यमातून आपल्या पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्य सरकारची कामे ही जनतेपर्यंत पोहचवण्याला प्राधान्य दिले पाहिजे. सोनवद आणि परिसराचा चौफेर विकास करण्याचा ध्यास आम्ही घेतला असून अजून लवकरच विविध कामे करण्यात येतील अशी ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, पंचायत समिती सभापती प्रेमराज पाटील; जिल्हा परिषद सदस्य गोपाळ चौधारी, विधासभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, राजेंद्र चव्हाण, किशोर पाटील, तालुका प्रमुख गजानन पाटील, डी. ओ. पाटील, पवन पाटील; युवा तालुका प्रमुख अमोल पाटील, नंदलाल पाटील, प्रदीप पाटील; सरपंच सोनवद आशाबाई पाटील, दामूअण्णा पाटील, तुकाराम पाटील, बबलू पाटील, शाखाप्रमुख पुंडलीक पाटील आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रविंद्र चव्हाण सर यांनी केले तर आभार संजय पाटील सर यांनी मानले.