जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करत तिच्या डोक्यात दागड टाकून खून केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-१९) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
भडगाव तालुक्यातील एका गावात सात वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. २९ जुलै रोजी पिडीत मुलगी दुपारी घरी एकटी असतांना गावात राहणारा स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील याने पिडीत मुलीला गुरांच्या गोठ्यात बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने घराच्या हा प्रकार सांगेल असे सांगितल्यानंतर संशयित आरोपी स्वप्निल पाटील हा घाबरला. गावात आरडाओरड करेल या भीतीने त्याने तिच्या डोक्यात दगड टाकून खून केला. त्यानंतर कुणाला संशयित येवून नये म्हणून गोठ्यात असलेल्या कडब्याच्या कुट्टीत लपवून ठेवले. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर भडगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, दोन दिवसांपासून मृतदेह कडब्याच्या कुट्टीत असल्याने त्यातून दुर्गंधी येवू लागल्याने हा प्रकार १ ऑगस्ट रोजी उघडकीला आला. मुलीचा मृतदेह संशयास्पद आढळून आल्याने खळबळ उडाली होती. भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणात संशयित आरोपी स्वप्निल पाटील याला ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्यावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली ही कारवाई
जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चोभे, पोहेकॉ विजयसिंह पाटील, सुधारक अंभोरे, विजय पाटील, लक्ष्मण पाटील, प्रितम पाटील, महेश महाजन, अनिल जाधव, अकरम शेख, किशोर राठोड, ईश्वर पाटील, किरण चौधरी, हेमंत पाटील, हरीष परदेशी, महेश पाटील, रमेश जाधव, भारत पाटील, प्रमोद ठाकूर, दर्शन ढाकणे यांनी कारवाई केली आहे.