
पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलिसांच्या सतर्कतेमुळे पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे एसबीआय एटीएम फोडून रोकड लुटण्याचा प्रयत्न फसला आहे. पहाटेच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत वाहनाचा पाठलाग सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

पाचोरा शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जारगाव येथील सारोळा रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या एटीएमवर आज पहाटे सुमारे ३.४५ वाजेच्या सुमारास चोरीचा प्रयत्न करण्यात आला. काही तरुण गॅस कटरच्या मदतीने एटीएम मशीन तोडून आतील रोकड लंपास करण्याच्या तयारीत होते.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पाचोरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. हेड कॉन्स्टेबल हरीश अहिरे आणि पोलीस कर्मचारी बंजारा यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी एटीएममधील रोकड असलेले कॅबिनेट बाहेर काढून काळ्या रंगाच्या क्रेटा कारमध्ये (क्रमांक MH 49 CS 7028) ठेवण्याच्या तयारीत तीन तरुण असल्याचे दिसून आले.
पोलिसांना पाहताच संशयितांनी तातडीने वाहनात बसून तारखेडा दिशेने पलायन केले. त्यानंतर पाचोरा पोलिसांनी संबंधित वाहनाचा पाठलाग सुरू केला. हे वाहन धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुलीपर्यंत पाठलाग करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी तत्काळ वाहनाची माहिती टोल नाके, धुळे जिल्हा तसेच मध्य प्रदेशातील संबंधित नियंत्रण कक्षांना दिली आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास आणि कारवाई सुरू आहे.
दरम्यान, या एसबीआय एटीएममध्ये अंदाजे ८ लाख ८९ हजार ७०० रुपयांची रोकड असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या वेळीच झालेल्या हस्तक्षेपामुळे मोठी चोरी टळली आहे. घटनेनंतर एसबीआयच्या एटीएम तांत्रिक विभाग आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतही प्रश्न उपस्थित झाले असून, घटनेची पाहणी करण्यासाठी संबंधित यंत्रणा अद्याप घटनास्थळी पोहोचलेली नसल्याची माहिती मिळत आहे.



