चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या संशिताची शहर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आणखी चार दुचाकी चोरल्याची त्यांनी कबुली दिली आहे. त्यावर पोलिसांनी सदर मोटारसायकली हस्तगत करून दोघांना अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त, “शहरातील देशमुखवाडी येथील सागर प्रवीण केले यांनी आपली होंडा कंपनीची सीबी शाईन दुचाकी (क्र. एम.एच. १९ बीएक्क्स १२०३) २६ जून रोजी जुने नगरपालिका जवळ उभी केलेली होती. तेवढ्यात अज्ञाताने ती चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्यावर सागर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुसार चाळीसगाव शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संशयित आरोपी सतिश सुरेश पाटील (वय- १९) रा. पाथराड ता. भडगाव यांना ताब्यात घेतले. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर वरील दुचाकीसह गुरन २५१/२०२२, गुरन २६०/२०२२ भादंवि कलम- ३७९ तसेच नांदगाव हद्दीतून चोरी झालेल्या एकूण ४ दुचाकीची कबुली दिली. त्यानुसार शहर पोलिसांनी सव्वा लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेऊन सतिश सुरेश पाटील (वय- १९) रा. पाथराड ता. भडगाव व विलास रवींद्र देसले (पाटील) (वय-२३) रा. पिंप्री या दोघांना अटक केली आहे. यामुळे दुचाकी चोरट्यांचे धाबे दणाणले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे, पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन कापडणीस, पोहेकॉ सुहास आव्हाड, पोना अभिमन पाटील, राहुल सोनवणे, सुभाष घोडेस्वार, दिपक पाटील, महेंद्र पाटील, पोकॉ भुषण पाटील, निलेश पाटील, विजय पाटील, शरद पाटील, अमोल भोसले, विनोद खैरनार, प्रविण जाधव आदींनी केली असून पुढील तपास पोना राहुल सोनावणे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार करीत आहे.