नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ऑगस्ट महिन्यात अर्ज करणाऱ्या तब्बल ५२ लाख महिलांच्या खात्यात आज 31 ऑगस्ट शनिवार रोजी जुलै आणि ऑगस्ट अशा २ महिन्यांसाठीचे एकूण ३००० रुपये पाठवले गेले. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे ही उपस्थित होत्या.
आदिती तटकरे म्हणाल्या, १७ ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या निधी वितरणात 1 कोटी 7 लाख महिलांच्या खात्यात 3000 रुपये पाठविले होते. म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1 कोटी 59 लाख महिलांच्या खात्यात 3000 रुपये राज्य सरकारने टाकले आहेत. एखाद्या डेबीट योजनेतून 1 कोटी 59 लाख लाभार्थीना थेट लाभ त्यांच्या खात्यात देण्याची ही देशातील सर्वात मोठी योजना आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, योजना सुरू झाली तेव्हा योजना अमलात येणार नाही, दहा टक्के महिलांना पैसे मिळणार नाही, अशी वल्गना महाविकास आघाडीचे नेते करत होते. महिलांना विचारा खात्यात पैसे पोहोचले की नाही. महिलांनो सांगा लाडकी बहीण आणि इतर सर्व थेट लाभाच्या योजना सुरू ठेवायच्या की नाही? बहिणींनो तुम्ही म्हणता योजना सुरू ठेवा. मात्र काँग्रेस पक्षाचे अनिल वडपल्लीवार हे कोर्टात गेले आणि त्यांनी लाडकी बहीण योजना आणि इतर सर्व योजना बंद करण्याची मागणी केली आहे. हे तेच अनिल वडपल्लीवार आहे, जे नागपूर लोकसभा मतदारसंघातून नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते. ते विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख होते. तसेच हेच अनिल वडपल्लीवार हे सुनील केदार यांचेही खास मित्र आहेत. त्यांनी योजना बंद करण्याची मागणी कोर्टात केली आहे. बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ इथे उभा आहे, न्यायालयात या योजनांवर गदा येऊ देणार नाही. आम्ही मोठ्या पैकी मोठा वकील लावून प्रकरण लडवू आणि योजना बंद पडू देणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.