रामेश्वर कॉलनीतील ‘त्या’ महिलेची हत्या करणारा अटकेत; एमआयडीसीत गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी ।रामेश्वर कॉलनीतील तुळजामाता नगर परिसरात भाजीविक्रेत्या महिला वंदना गोरख पाटील यांची हत्या करून पसार झालेला संशयित आरोपी सुरेश सुकलाल महाजन रा. रामेश्वर कॉलनी याला अवघ्या काही तासात आज शुक्रवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीसांनी चोपडा शहरापासून अटक केली आहे. आज शुक्रवारी २७ ऑगस्ट रोजी पहाटे ३.३० वाजता लोखंडी वस्तूने घाव घालून वंदना पाटील यांचा खून केल्याचे कबुल केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वंदना गोरख पाटील (वय-४२) रा. तुळजामाता नगर, रामेश्वर कॉलनी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना पाटील ह्या भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. रमेश पुंडलिक वंजारी यांच्याघरात १ जून २०२१ पासून भाड्याने राहातात. त्याचे पती गोरख पाटील यांचे १५ ते २० वर्षांपुर्वी मयत झालेले आहे. यात वंदना पाटील यांची संशयित आरोपी सुरेश सुकलाल महाजन यांची १५ वर्षांपुर्वी भाजीपाला मार्केटमध्ये ओळख निर्माण झाली व प्रेमसंबंध जुळले. यासंदर्भात सुरेश महाजन यांच्या कुटुंबियाला संबंधाबाबत माहिती होती. त्यामुळे दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे सुरू होते आणि सोबत राहणे सुरू होते. सुरेश महाजन हा वंदना पाटील यांना घरखर्च करण्यासाठी पैसे देत होते. पैसे देण्यावरून दोघांमध्ये भांडण होत होते. २६ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० जेवण करून दोघे झोपले. मध्यरात्री ३.३० वाजेच्या सुमारास सुरेश महाजन याने पिण्यासाठी पाणी मागितले. त्यावर वंदना पाटील यांनी तुमच्याच हाताने पाणी घ्या, तुमचे हात मुडले का ? असे सांगितल्याचा राग आल्याने भाजी पाला विक्री करण्यासाठी लागणारा लोखंडाचा एक किलो डोक्यात टाकला. एका घावात वंदना पाटील बेशुध्द झाल्या. बेशुध्द झाल्याचे पाहून सुरेश महाजन याने पुन्हा पुन्हा वार करत ठार केले. सकाळी ४ वाजता दुचाकीने चोपडा कडे पसार झाला.  

वंदना पाटील याचा घरात दरवाजा सकाळी ९ वाजेपर्यंत बंद असल्यामुळे शेजारी राहणारा तरूणी कुणाल पाटील याला शंका आली. दरवाजा ढकलून बघितले तर वंदना पाटील यांचा खून झाल्याचे दिसून आले. त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. खून झाल्याची वार्ता रामेश्वर कॉलनीत वाऱ्यासारखी पसरली.  अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी आणि सहाय्यक पोली अधिक्षक कुमार चिंता यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलीसांना सुरेश महाजन आणि वंदना पाटील यांच्या संबंधाबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी चक्रे फिरवत संशयित आरोपी सुरेश महाजन याला चोपडा शहरपासून जवळ असलेल्या एका मंदीरात लपलेला असल्याचे समजले. दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याला अटक केली आहे. संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Protected Content