पुणे वृत्तसंस्था | महाराष्ट्रात विविध परिक्षांच्या पेपर फुटीचं सत्र सुरुच आहे. आता लष्कराचा ‘व्हेईकल मेकॅनिक’ या पदाच्या भरतीचा पेपर फुटल्याचं झाल्याचं उघड झालं आहे. आर्मी इंटिलिजन्स ब्युरो आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी हे प्रकरण समोर आणत दोन माजी सैनिकांसह एजंटला अटक केली आहे.
‘जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्स’ अर्थात ‘जीआरईएफ’ या विभागासाठी दि ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी भरती पार पडली. या भरतीत ४० परीक्षार्थींना त्यांनी पेपर पुरवले होते. त्यापैकी 36 परीक्षार्थी पास होऊन, त्या पदावर रुजू झाल्याचा दावा पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी कारवाई करत निवृत्त लायन्स नाईक सतीश डहाणे, निवृत्त मिस्त्री श्रीराम कदम आणि एजंट अक्षय वानखेडे यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
या संयुक्त कारवाईत दोन माजी सैनिकांसह एका एजंटला बेड्या ठोकण्यात आल्या असून या माजी सैनिकांनी लष्कराच्या एका विभागातील व्हेईकल मेकॅनिक या पदाच्या भरतीचा पेपर फोडल्याचं तपासात समोर आलं आहे. आर्मी इंटिलिजन्स ब्युरोला मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी दि,४जानेवारी रोजी रक्षक चौकात सापळा रचला होता.
गजानन मिसाळ आणि धनंजय वट्टमवार यांना तिन्ही आरोपींनी संगनमत करून भरतीचे आमिष दाखवले होते. लष्कराच्या ‘जीआरईएफ’ विभागातील ‘व्हेईकल मेकॅनिक’ पदाच्या भरतीसाठीची ५ लाख रुपयांची बोली ठरली त्यानुसार पहिली टोकन रक्कम पिंपरी चिंचवड परिसरात स्वीकारली जाणार होती. तीच ७० हजाराची रक्कम स्वीकारताना आर्मी इंटिलिजन्स ब्युरोने त्यांना ताब्यात घेतलं. मग पिंपरी चिंचवड पोलिसांना पाचारण करून त्यांना अटक करण्यात आली.
न्यायालयाने आरोपींना १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या तिघांकडून लष्कर भरतीशी संबंधित बनावट कागदपत्रे आढळून आली आहेत. त्यानुसार पोलिसांनी तपासणी केली असता दि. ३१ ऑक्टोबरला झालेल्या भरतीचा पेपर फोडण्यात आल्याचं समोर आलं. माजी सैनिकांकडे हे पेपर नेमके कसे आले याचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहे.