गुवाहाटी/नवी दिल्ली, वृत्तसंस्था | मैदानावरील छोटीशी चूक देखील खेळाडूच्या जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना आसाममध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स २०२० मध्ये घडली. तिरंदाजीचा सराव करत असताना एका १२ वर्षीय खेळाडूच्या मानेत बाण घुसला. डॉक्टरांनी चार तासांच्या ऑपरेशननंतर युवा तिरंदाजाचा जीव वाचवला.
आसामच्या गुवाहाटी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत सहभागी झालेली १२ वर्षीय शिवगिनी गोहेम सरावादरम्यान जखमी झाली. ६५ सेमीचा बाणेचा १५ सेमी भाग शिवगिनीच्या मानेत घुसला. बाण शिवगिनीच्या मानेतून मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीजवळ पोहोचला होता.
बाण शिवगिनीच्या मानेतून काढताना थोडी जरी चूक झाली असती तर तिचे करिअर संपले असते. पण एम्स रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरचे न्यूरो सर्जन डॉक्टर दीपक गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चार तासाच्या प्रयत्नानंतर शिवगिनीच्या मानेतून बाण बाहेर काढला. इतक नव्हे तर पुढील काही महिन्यात ती पुन्हा मैदानात उतरेल असा विश्वास गुप्ता यांनी व्यक्त केला.
या घटनेनंतर शिवगिनीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तेथील डॉक्टरांना बाण मानेतून काढता आला नाही. त्यामुळे तिला विमानाने दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले.आमच्यासाठी हे ऑपरेशन आव्हानात्मक होते. अशा प्रकारची घटना याआधी कधीच समोर आली नव्हती. बाण १५० किमीच्या वेगाने टॉप अँगलने मानेमध्ये घुसला होता. यात दोन हाडांचे नुकसान झाले होते. शिवगिनीला जेव्हा ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले तेव्हा ती पुन्हा तिरंदाजी करायची आहे, असे सांगत होती. आमच्या हातात एका १२ वर्षांच्या मुलीचे करिअर होते. एक छोटीशी चूक तिच्या रक्तवाहिनीला नुकसान पोहोचवू शकली असती, असे गुप्ता म्हणाले.
शिवगिनीला रात्री ८.०० वाजता दाखल केले गेले. गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ऑपरेशन कसे करायचे, याचे नियोजन रात्री केले आणि सकाळी ६.०० वाजता ऑपरेशन करण्यास सुरुवात केली. चार तासानंतर बाण मानेतून बाहेर काढण्यात यश आले. देशात अशा प्रकारच्या अपघाताची घटना याआधी कधी झाली नव्हती. आसाममधील डॉक्टरांनी बाण काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. आता शिवगिनीची प्रकृती उत्तम असून तिला वॉर्डमध्ये शिफ्ट केल्याचे गुप्ता यांनी सांगितले.