गांधी जयंतीपर्यंत शेतकरी आंदोलकांची माघार नाही ; टिकैत यांची घोषणा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गाझीपूर सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन महात्मा गांधी जयंती अर्थात 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी ही मोठी घोषणा केली आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७३ दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही या प्रश्नावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. अशा स्थितीत गाझीपूर सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन 2 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

दिल्ली आणि उत्तर प्रदेशाची सीमा असलेल्या गाझीपूर सीमेवरील आंदोलनाचं नेतृत्व राकेश टिकैत करत आहेत. केंद्र सरकार तिनही कृषी कायदे रद्द करेल तेव्हाच आंदोलक शेतकरी आपल्या घरी परततील असं टिकैत यांनी यापूर्वीही स्पष्ट केलं आहे. आता मात्र २ ऑक्टोबरपर्यंत हे आंदोलन सुरुच राहणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

 

प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवर मोठे खिळे ठोकून आणि सिमेंटच्या भिंती उभारुन खबरदारी घेतली होती. पण पोलिसांची ही खबरदारी केंद्र सरकारच्या अंगाशी आल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, खिळे ठोकलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देश-विदेशातून मोदी सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यामुळे रस्त्यांवर ठोकलेले खिळे अखेर पोलिसांना काढावे लागले. पण आता या खिळे ठोकलेल्या जागेवरच फुलं लावणार असल्याची घोषणा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे.

Protected Content