अमळनेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील कळमसरे येथील अर्चना सुदाम माळी यांनी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एल.एल.बी.त गोल्ड मेडलसह संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. जळगाव येथे नुकत्याच झालेल्या पदवी प्रदान सोहळ्यात अमेरिकेतील भारतीय उद्योजक मुकुंद करंजीकर, कुलगुरू पी.पी.पाटील, ॲड. एस.बी.अग्रवाल, पती शिक्षक सुदाम माळी यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानपत्र गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
अर्चना माळी सध्या बुरहानपुर येथे सिव्हिल कोर्टात वकील व्यवसायाची प्रॅक्टिस करीत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, “उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना मी जे स्वप्न पाहिले होते, ते स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याने मनस्वी आनंद झाला आहे. यामागे माझे सासरे, माझे पती व नातेवाईक खंबीरपणे उभे राहिले, त्यामुळे मी वकिली व्यवसायामध्ये नावलौकिक करू शकली आहे. भविष्यात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून न्यायाधीश होऊन समाजाच्या तळागाळातल्या लोकांना न्याय देण्याचा व प्रामाणिकपणे काम करण्याचा मानस आहे.”त्यांच्या यशाबद्दल त्यांच्या कॉलेजचे प्राध्यापक, कळमसरेचे उपसरपंच मुरलीधर महाजन, माजी ग्राम पंचायत सदस्य शिक्षक बंधू-भगिनी यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.