यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या महत्त्वाकांक्षी तापी महाकाय पुनर्भरण योजनेच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला आता वेगळी दिशा मिळाली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये ‘ताप्ती बेसिन मेगा रिचार्ज प्रकल्पा’साठी ऐतिहासिक सामंजस्य करार नुकताच संपन्न झाला. या प्रकल्पामुळे हजारे हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे, याचा आनंद व्यक्त करत भाजपा कार्यकर्त्यांसह आमदार अमोल जावळे यांनी फटाके फोडून जल्लोष केल्याचे दिसून आले.
या करारावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या महत्त्वपूर्ण प्रसंगी राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन विशेषत्वाने उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील २ लाख १३ हजार ७०६ हेक्टर आणि मध्य प्रदेशातील ९६ हजार ०८२ हेक्टर जमिनीला अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे. म्हणजेच, एकूण ३ लाख ०९ हजार ७८८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, त्यापैकी ४८ हजार हेक्टर क्षेत्राला थेट सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पासाठी ३९.१३ टीएमसी पाणी वापरले जाणार असून, त्यात ८.३१ टीएमसी क्षमतेचा डायव्हर्जन वीअर, २२१ किलोमीटर लांबीचा उजवा कालवा आणि २६० किलोमीटर लांबीचा डावा कालवा यांचा समावेश असणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च १९ हजार २४४ कोटी रुपये इतका आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण क्षेत्राचे ‘लिडार’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्वेक्षण पूर्ण झाले असून, लवकरच सर्व प्रशासकीय मान्यता मिळवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
या ऐतिहासिक क्षणी आ.अमोल जावळे यांनी आनंद व्यक्त करत फटाके फोडून जल्लोष केला. त्यांनी या महत्त्वपूर्ण करारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, मार्गदर्शक मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि भाजप नेत्या आ.अर्चना चिटणीस यांचे आभार मानले. हा प्रकल्प तापी नदीच्या खोऱ्यातील शेतीला नवसंजीवनी देणारा ठरणार असून, कृषी आणि जलसंधारण क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.