जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात आणि परिसरात भटक्या व पाळीव प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. एप्रिल महिन्यात जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तब्बल ८१४ नागरिकांनी प्राण्यांच्या चाव्यांमुळे उपचार घेतले आहेत. यात सर्वाधिक चाव्यांचे प्रमाण कुत्र्यांमुळे असून, मांजर, उंदीर, माकड, डुक्कर, बोकड आणि धक्कादायक बाब म्हणजे माणूस चावल्याचे प्रकारही समोर आले आहेत.
रुग्णालयाच्या इंजेक्शन विभागात दररोज सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ओपीडीच्या माध्यमातून नागरिक रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन घेण्यासाठी येतात. एप्रिल महिन्यात एकट्या कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे ७६० जणांनी उपचार घेतले असून, यामध्ये ४८६ पुरुष, १५५ महिला आणि १२५ बालकांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण केवळ जिल्ह्यातील नसून त्यात शहरातील नागरिकांची संख्या लक्षणीय आहे, जे शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास किती गंभीर आहे हे अधोरेखित करते.
याशिवाय, मांजर चावल्यामुळे ३४ जणांना उपचार घ्यावे लागले. उंदीर चावल्यामुळे ६ पुरुषांनी, माकड चावल्यामुळे एका व्यक्तीने, डुक्कर चावल्यामुळे ३ आणि माणूस चावल्यामुळे ३ जणांनी हॉस्पिटल गाठले आहे. एका महिलेला बोकड चावल्याचा प्रकारही समोर आला आहे. अशा घटनांमुळे वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, प्राणी चावल्यास जखम झाकू नये, तिला स्वच्छ पाण्याने धुऊन उघडी ठेवावी आणि तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात यावे. सकाळी ओपीडी क्रमांक १०९ मध्ये तर दुपारी आपत्कालीन विभागातील कक्ष क्रमांक एक येथे संबंधित उपचार उपलब्ध आहेत.
जळगाव जिल्ह्यात भटक्या व पाळीव प्राण्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, एप्रिल महिन्यात ८१४ रुग्णांना रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन घेण्याची वेळ आली आहे. प्रशासन व आरोग्य यंत्रणांनी या बाबतीत अधिक कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.