ॲपलचा मोठा निर्णय; ‘या’ उत्पादकाचे उत्पादन भारतात होणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | टेक जायंट ॲपलने भारतात उत्पादन वाढवण्याच्या दिशेने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वीच कंपनीने भारतात आयफोनची निर्मिती सुरू केली होती, ज्याचा मोठा फायदा भारतीय ग्राहकांना झाला. आता याच धर्तीवर ॲपलने त्यांच्या लोकप्रिय उत्पादनांपैकी एक असलेल्या एअरपॉड्सची असेंबली भारतात करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि व्हिएतनामसारख्या देशांमध्ये उत्पादन केंद्र स्थापन करून ॲपलचीनवरील आपले अवलंबित्व कमी करत आहे. इंडियाटुडेच्या अहवालानुसार, कंपनी एप्रिल महिन्यापासून हैद्राबादमधील फॉक्सकॉन प्लांटमध्ये एअरपॉड्स असेंबल करण्यास सुरुवात करणार आहे. यापूर्वी या प्रकल्पाविषयी दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा झाली होती आणि आता प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार आहे. भारतात असेंबल केलेले एअरपॉड्स स्थानिक बाजारात विकले जाणार नाहीत, तर त्यांची निर्यात केली जाणार आहे. यामुळे भारतातील उत्पादन क्षेत्राला मोठा चालना मिळेल आणि जागतिक बाजारपेठेत भारतीय मॅन्युफॅक्चरिंगचे महत्त्व वाढेल.

ॲपल 2017 पासून भारतात आयफोन असेंबल करत आहे. कंपनीने SE सीरीजपासून सुरुवात केली आणि नंतर आयफोन 12, 13, 14, 15 आणि आता आयफोन 16 सीरीजदेखील भारतात तयार केली जात आहे. विशेष म्हणजे, आयफोन 16 प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल्सचे उत्पादनही भारतात सुरू करण्यात आले आहे, जे पूर्वी फक्त एंट्री-लेव्हल मॉडेल्सपुरते मर्यादित होते. ॲपलच्या भारतातील उपस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे.

सध्या कंपनीचे दोन अधिकृत स्टोअर्स आहेत आणि आणखी चार स्टोअर्स उघडण्याची योजना आहे. स्थानिक उत्पादन वाढवण्याच्या या निर्णयामुळे भारतातील तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळेल आणि जागतिक इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये भारताची भूमिका अधिक महत्त्वाची ठरेल. ॲपलच्या या निर्णयामुळे भारतीय मॅन्युफॅक्चरिंग उद्योगासाठी नवीन संधी उपलब्ध होणार असून, भारत हळूहळू एक महत्त्वाचे उत्पादन केंद्र बनत आहे. भविष्यात ॲपल भारतात आणखी कोणत्या उत्पादनांची निर्मिती करणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Protected Content