शिवसेना-भाजपचे काहीही ठरले तरी मी भाजपमध्ये प्रवेश करणारच : नारायण राणे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) मी भाजपत प्रवेश करणार हे निश्चित आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर माझा विश्वास आहे. भाजपच्या तिकिटावरच आमच्या संघटनेचे आमदार लढणार आणि पक्ष विलीन करून भाजपमध्ये प्रवेश करणार, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले आहे. एवढेच नव्हे तर, त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे हे भाजपमधूनच निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रा कोकणात पोहोचल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा आज सिंधुदुर्गात पोहोचली. या यात्रेचे नारायण राणे यांनी स्वागत केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. शिवसेना-भाजपचे काहीही ठरले तरी मी भाजपमध्ये प्रवेश करणारच, असेही त्यांनी सांगितले. राणे सध्या भाजपने पुरस्कृत केलेले राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा औपचारिक भाजप प्रवेश अद्याप झालेला नाही. दुसरीकडे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढून जिंकून आले होते. ते अजूनही त्याच पक्षात आहेत.

Protected Content