मुक्ताईनगर, प्रतिनिधी | येथील १३२ केव्ही विद्युत केंद्रातून ३३ केव्ही अंतुर्ली व ३३ केव्ही नायगांव या दोन उपकेंद्रांना जाणाऱ्या वाहिनीला ऊर्जामंत्री ना. बावनकुळे यांनी नुकतीच मंजुरी दिली, याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांची गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरु होता. या वाहिनी मंजुरीचे श्रेय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी पं.स. सदस्य किशोर चौधरी घेत असल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्याने ते सुद्धा राष्ट्रवादीला राम-राम ठोकून भाजपच्या आगामी मेगा भरतीत सहभागी होतात की काय ? असा प्रश्न सरपंच अंतुर्ली ताहेर खान पठाण यांनी विचारला आहे.
मुक्ताईनगर १३२ के.व्ही. उपकेंद्र येथून ३३/११ के.व्ही. उपकेंद्र अंतुर्ली व नायगांव या दोन उपकेंद्रांना पुरवठा करणारी ३३ के.व्ही. वाहिनी जीर्ण झाल्याने उपरोक्त उपकेंद्रावरील शेती पंप ग्राहकांना पुरेशा दाबाने विजपुरवठा मिळत नव्हता. याशिवाय वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत होता. याबाबत शेतकरी वर्गाकडून वारंवार आ. खडसे यांचेकडे वाहिनी सक्षमीकरणाची मागणी करण्यात येत होती. या अनुषंगाने स्वत: आ. खडसे हे या विद्युत वाहिनी सक्षमीकरणासाठी शासन दरबारी आग्रही होते. त्यांनी उर्जामंत्री ना. बावनकुळे यांचेकडे प्रत्यक्ष भेटून लेखी पत्रव्यवहार करून याकडे तातडीने मंजुरी मिळावी, यासाठी सतत प्रयत्नशील होते. याबाबत दि.१२ जुलै २०१८ लाही त्यांनी ऊर्जामंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला होता. त्याशिवाय खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनीही १२ फेब्रु २०१८ ला उर्जामंत्र्यांना पत्र लिहून या उच्चदाब वाहिनीचे आयपीडीएस योजनेअंतर्गत समावेश करण्याचे सुचवले होते. या पाठपुराव्याची फलश्रुती म्हणजेच उर्जामंत्री ना.बावनकुळे यांनी या वाहिनीच्या सक्षमीकरणासाठी नुकतीच दिलेली मंजुरी आहे, अशी माहिती आ. खडसे यांनी दिली आहे.विशेष म्हणजे महावितरणच्या वेळोवेळी झालेल्या प्रत्येक पत्रव्यवहारात आ. खडसेच्या पत्रव्यवहारांचा संदर्भ देण्यात आला आहे.
फुकटचे श्रेय कशासाठी ? :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य किशोर चौधरी हे या वाहिनीचे श्रेय स्वत:कडे घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. याबाबत त्यांनी जि. प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांना कळवले होते. तदनंतर पालकमंत्री ना. महाजन यांच्या माध्यमातुन मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक वस्तुस्थिती काय आहे, ते तालुकावासी जाणून आहेत. या परिस्थितीमुळे किशोर चौधरी भाजपच्या मेगा भरतीत पक्ष बदल करणार की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.