भूमिपुत्राला अचानक उमाळा का आला ? – पराग पाटील यांचा सवाल

amalner prachar

अमळनेर, प्रतिनिधी | भूमिपुत्र असल्याचा आव आणीत येथील मतदार संघाविषयी उमाळा व्यक्त करणारे येथील उमेदवार मागील पाच वर्ष राजकारणातून बाद झाल्यासारखे वागले आणि आताच अचानक भूमिपुत्र असल्याचा आव आणून भावनिक राजकारण का करू पाहत आहेत ?  याउलट अशा कोणत्याही गोष्टीवर टीकाटिपणी न करता सतत पाचवर्षे जनतेची खरी सेवा करीत ज्यांनी १५५० कोटी रुपयांपर्यंतचा विकास निधी या मतदारसंघासाठी ओढून आणला, त्या आ. शिरीष चौधरी यांच्या पाठीशी जनता उभी आहे, असा विश्वास बाजार समितीचे संचालक पराग पाटील यांनी आज (दि.१२) एका पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.

 

पत्रकात म्हटले आहे की, आपणच भूमिपुत्र असल्याचा दावा करणाऱ्या उमेदवारांबद्दल जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या मतदार संघात आणखी चार-पाच उमेदवार स्थानिक असून ते भूमिपुत्र नाहीत का ? असाही प्रश्‍न केला जात आहे.अमळनेर मतदारसंघात अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहेत. ते कोणामुळे प्रलंबित राहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी या भूमिपुत्रांनी यापूर्वी कधी, काही केले आहे का ? याची तपासणी करण्याची वेळ आज आली आहे. बंद अवस्थेत असलेल्या उपसा सिंचन योजना, रखडलेला माळण पांझरा नदीजोड प्रकल्प, अपूर्ण क्रीडा संकुल यासह अनेक प्रलंबित कामांविषयी व अवैध धंद्यांविषयी हे कोणीही बोलले नाही. कधी पाठपुरावा करताना दिसले नाही. त्याविषयी कोणतीही चर्चा न करता आता फक्त भावनिक राजकारण करण्यावर भर देण्यात येत आहे. यांना नगरपालिकेत, जिल्हा बँकेत, जिल्हा परिषदेला तीन टर्म संधी मिळाली, परंतु ठोस असं कोणतेही काम त्यांनी केले नाही. लोकप्रतिनिधी म्हटला की, त्याच्या कामाची धमक पाहिली जाते, त्याच्या पाठीशी सत्ता आहे की नाही ते पाहिले जाते. त्यामुळे भूमिपुत्र असल्याचा मुद्दा कुचकामी ठरणार असून मतदार महायूतीचे उमेदवार शिरिष चौधरी यांनाच पुन्हा निवडून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Protected Content