शेतकर्‍यांना फळ पिक विम्याचे मिळणार ३०२ कोटी रूपये

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे लिंबू, पेरू, सिताफळ आणि मोसंबी आणि केळी फळ पिकासाठी ३०२ कोटी नुकसान भरपाई मंजूर होणार असून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, , जळगाव जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या अंतर्गत पुनर्रचीत हवामानावर आधारित पीक विमा योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला. या अनुषंगाने कृषी खात्याच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, आत्मा समितीचे प्रमुख मनोहर चौधरी, जिल्हास्तरीय कृषी समितीचे अध्यक्ष हितेश आगीवाल, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती

जळगाव जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या अंतर्गत पुनर्रचीत हवामानावर आधारित पीक विमा योजना ही २०२१-२२; २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांसाठी लागू करण्यात आलेली आहे. यात १८ जून २०२१ रोजीच्या शासकीय निर्णयानुसार शेतकर्‍यांना नुकसान भरपाईसाठी नवीन निकष जारी करण्यात आले आहेत. यानुसार, कमी तापमान या निकषाच्या अंतर्गत १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारीच्या दरम्यानच्या कालावधीत सलग तीन दिवसांपर्यंत किमान तापमान ८ अंश सेल्सीयस वा त्यापेक्षा कमी राहिल्यास प्रति हेक्टरी नुकसान भरपाई २६ हजार ५०० रूपये (कमाल नुकसान भरपाई २६,५०० रूपये) देय राहणार आहे. वेगाचा वारा या निकषाच्या अंतर्गत १ मार्च ते ३१ जुलैच्या दरम्यानच्या कालावधीत ४० किलोमीटर प्रति-तास वा त्यापेक्षा जास्त गतीने वारे वाहिल्याची नोंद हवामान केंद्रावर झाल्यास केळी आंबिया बहार पिकासाठी नुकसान भरपाई मिळेल. यात नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत ही माहिती कृषी विभाग व विमा कंपनीला कळविल्यानंतर पंचनामा पध्दतीन प्रति हेक्टरी कमाल ७० हजार रूपये इतकी नुकसान भरपाई मिळेल.

जादा तापमान या निकषाच्या अंतर्गत १ एप्रिल ते ३० एप्रिल या कालखंडात सलग पाच दिवस ४२ अंश वा त्यापेक्षा जास्त तापमान असल्यास रूपये ३५ हजार प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई मिळेल. तसेच १ मे ते ३१ मे या कालखंडात सलग ५ दिवस ४५ अंश वा त्यापेक्षा अधिक तापमान असेल तर प्रति हेक्टरी ४३,५०० रूपये (कमाल ४३,५०० रूपये) मिळणार आहे. तसेच १ जानेवारी ते ३० एप्रिलच्या दरम्यानच्या कालखंडात गारपीट झाल्यास प्रति हेक्टरी ४६ हजार ६६७ रूपयांची भरपाई मिळणार असल्याचे या शासन निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे.

या निर्णयानुसार, जळगाव जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी, लिमिटेड, मुंबई यांच्या माध्यमातून आंबिया बहारासाठी पुनर्रचीत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आलेली आहे. सदर योजनेत मृग बहारमद्ये लिंबू, पेरू, सितफळ आणि मोसंबी पिकासाठी नुकसानग्रस्त ५३७ शेतकर्‍यांना ७७ लक्ष ७० हजार रूपयांची नुकसान भरपाई मंजूर होऊन थेट शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आली असून आंबिया बहारमध्ये केळी पिकासाठी कमी तापमानाच्या निकषाच्या अंतर्गत १२७ कोटी तर जास्त तापमानासाठी १७५ कोटी अशी एकूण ३०२ कोटी नुकसान भरपाई मंजूर होणार असल्याने असल्याने ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार असून पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळालेला आहे.

या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना निसर्गाच्या अवकृपेचा मोठा फटका बसत असल्याने पुनर्रचीत हवामानावर आधारित पीक विमा योजनेतील लाभ वेळेत मिळणे आवश्यक होते. या अनुषंगाने पाठपुरावा केल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये ही रक्कम थेट जमा होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण नेहमीच खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.

Protected Content