रेल्वे व प्लॅटफॉर्मच्यामध्ये पाय अडकल्याने वृद्ध गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुरत येथून ओडिसा येथे जात असताना जळगाव रेल्वे स्थानकावरुन काही वस्तू घेऊन पुन्हा रेल्वेत चढत असताना नारायणदास असुदानी (६७, रा. पुरी, ओडिसा) यांचा पाय घसरुन ते रेल्वे व प्लॅटफॉर्मच्यामध्ये पाय अडकून गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवार, २ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. रेल्वे पोलिसांनी जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

याबाबत माहिती अशी की, नारायणदास असुदानी हे पत्नी सीमादेवी असुदानी यांच्यासह सुरत येथून ओडिसा राज्यातील पुरी येथे पुरी एक्सप्रेसने निघाले होते. मंगळवारी २ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता जळगाव स्थानकावर रेल्वे आली त्या वेळी ते काही वस्तू घेण्यासाठी खाली उतरले. काही वेळाने रेल्वे सुरू झाल्याने घाईघाईने नारायणदास हे रेल्वेत चढायला लागले. त्याचवेळी त्यांचा पाय घसरला आणि ते प्लॅटफॉर्म आणि रेल्वे या दोघांच्यामध्ये त्यांचा डावा पाय अडकला. त्यात ते गंभीर जखमी झाले. यावेळी रेल्वे पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्यांना प्लॅटफॉर्मवर ओढले. त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

Protected Content