Home Cities जळगाव जळगावातील खड्ड्यांवरून मनसेचे मनपाविरोधात आंदोलन ; धनदांडग्यांना अभय का? असा सवाल

जळगावातील खड्ड्यांवरून मनसेचे मनपाविरोधात आंदोलन ; धनदांडग्यांना अभय का? असा सवाल

0
32

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि अतिक्रमण कारवाईतील कथित दुजाभावाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गुरुवारी (१ ऑक्टोबर) जळगाव महानगरपालिकेसमोर एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. शहरातील खड्डे तत्काळ बुजवावेत, तसेच अतिक्रमण कारवाईमध्ये समान निकष लागू करावेत, अशा विविध मागण्या यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी केल्या.

जळगाव शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना या खड्ड्यांमधून मार्ग काढताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाहनचालक तसेच दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून सततच्या खराब रस्त्यांमुळे नागरिकांच्या पाठीचे व मणक्याचे आजार उद्भवत असल्याचा दावा मनसे पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता शहरातील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, महानगरपालिकेकडून शहरातील अतिक्रमणांवर कारवाई केली जात असताना छोट्या व्यावसायिकांवरच कारवाई केली जाते; मात्र मोठ्या व धनदांडग्या व्यक्तींच्या अतिक्रमणांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष का केले जाते, असा सवाल मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. अतिक्रमण कारवाई करताना कोणताही भेदभाव न करता सर्वांवर समान पद्धतीने कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था दूर करणे, खड्डे तातडीने बुजवणे आणि अतिक्रमण कारवाईमध्ये पारदर्शकता आणणे या मागण्यांसाठी मनसेने हे आंदोलन केले. प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका मनसेने मांडली. या मागण्या आगामी काळात मान्य न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अधिक तीव्र स्वरूपाचे ‘मनसे स्टाईल’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे आता महानगरपालिका प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, चेतन पवार, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, शाखाध्यक्ष युसुफ खाटीक, राजेंद्र बाविस्कर, साजन पाटील, राजेश मराठे, खुशाल ठाकूर, दीपक राठोड यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.


Protected Content

Play sound