जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने डावलण्यात येणार्या जावळे कुटुंबातील अमोल हरीभाऊ जावळे यांना लोकसभेचे तिकिट न मिळाल्याने भारतीय जनता पक्षातून नाराजीची लाट उसळली आहे. त्यांनी मात्र स्वत: उमदेपणा दाखवत आपण पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे जाहीर करत भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मने खर्या अर्थाने जिंकली आहेत.
भारतीय जनता पक्षाचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे तिकिट मिळणार असल्याचे संकेत मिळाले होते. मात्र ऐन वेळेस विद्यमान खासदार रक्षा निखील खडसे यांना पुन्हा तिकिट मिळाल्याने लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. यातून अनेकांनी आपापले राजीनामे सुपुर्द करत आक्रमक पवित्रा घेतला. अमोल जावळे यांनी मात्र पहिल्याच दिवशी आपली भूमिका स्पष्ट करत पक्षाच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे नमूद केले. मात्र सहा दिवस उलटून देखील पदाधिकार्यांचा रोष कमी होण्यास तयार नसतांना काल जळगावातील ब्राह्मण संघात झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत या सर्व बाबींवर पडदा टाकला.
या मेळाव्यात अमोल जावळे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मी नाराज असल्याचे वृत्त येत आहे. मात्र मी नाराज नाही. मी हरीभाऊ जावळे यांचा पुत्र आहे. ज्यांनी २०१४ साली जाहीर झालेले तिकिट कापले गेले तरी त्यांनी रक्षाताईंचा प्रचार करून त्यांच्या विजयात हातभार लावला. सोबत मी संघाचा स्वयंसेवक देखील असल्याने आपण पक्षाचा प्रचार करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने जावळे कुटुंबावर अन्याय होत आहे. २०१४ साली हरीभाऊ जावळे यांचे तिकिट ऐन वेळेस कापण्यात आले. तर २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे त्यांचा पुन्हा घात झाला. यानंतर कोरोनाच्या आघातात ते स्वर्गवासी झाल्यावर त्यांचे पुत्र अमोल जावळे यांच्या माध्यमातून अन्यायाचे परिमार्जन करण्यात येईल असे वाटत असतांना ते देखील झाले नाही. हे सर्व आघात सहन करून देखील अमोल जावळे यांनी आपल्या वर्तणुकीतून आपण हरीभाऊंचे पुत्र आणि संघाचे सच्चे स्वयंसेवक असल्याचे दाखवून दिले आहे.
अमोल जावळे यांच्या या उमदेपणामुळे पक्षाच्या मेळाव्यातील उपस्थित नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा जोरदार कडकटाट करत त्यांना दाद दिली. स्व. हरीभाऊ जावळे यांची सेवा व त्याग तर संघाच्या समर्पणाचे आपण पाईक असल्याचे त्यांनी दाखवून दिले. तसेच, या माध्यमातून त्यांनी भाजप समर्थकांची मने खर्या अर्थाने जिंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.